Breaking News

दंडाची रक्कम भरत भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी केला लोकलने प्रवास अटक केली तरी सर्वसामान्यांच्या लोकल सेवेसाठी संर्घष सुरूच राहणार-दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

 लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज चर्चगेट रेल्वे स्थानकात भाजपच्या वतीने रेल भरो आंदोलन करण्यात आले. सरकारच्या दडपशाहीला न जुमानता दरेकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करत चर्चगेट रेल्वे स्थानकात प्रवेश करून चर्चगेट स्थानक ते चर्नी रोड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने प्रवास केला. राज्य सरकार व पोलिसांनी आम्हाला कितीही अडविण्याचा प्रयत्न केला व आम्हाला अटक केली तरी सर्वसामान्यांच्या लोकलसेवेसाठी आम्ही आमचा हा संघर्ष सुरूच ठेवू पण सरकारची मुस्कटदाबी सहन करणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी दिला.

भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी आज राज्य सरकारच्या विरोधात मुंबईच्या सर्व स्थानिक रेल्वे स्थानकांवर रेल भरो आंदोलन केले. चर्चगेट स्थानकात प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,  आमदार राहुल नार्वेकर,भाजपचे  जिल्हा महामंत्री राकेश मिश्रा,  महामंत्री दीपक सावंत, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चगेट रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी प्रविण दरेकर, लोढा, नार्वेकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. रेल्वे आमच्या हक्काची… नाही कुणाच्या बापाची,  लोकलसेवा सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करा… भारतमाता की जय…,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी आमदार राहुल नार्वेकर यांना चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर ताब्यात घेतले. परंतु पोलिसांचा विरोध झुगारून दरेकर आणि लोढा यांनी चर्चगेट रेल्वे स्थानकात धडक मारली. पण पोलिसांनी प्रवेशद्वारावर दरेकर यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरेकर यांनी  पोलिसांकडे रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मागितली. परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली, पण पोलिसांचा बंदी आदेश मोडून दरेकर यांनी रेल्वे स्थानकात प्रवेश केला. चर्चगेट रेल्वे स्थानकात दरेकर यांचे स्वीय सहाय्यक सागर बागुल यांनी प्रसिद्धी  माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी रेल्वे प्रवासाचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, पण रेल्वे तिकीट खिडकीवर त्यांना तिकीट दिले नाही.

चर्चगेट रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमध्ये दरेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. परंतु रेल्वेने ही लोकल कारशेडमध्ये जात असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दरेकर यांनी बाजूच्या प्लॅटफॉर्मवरील दुस-या लोकलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या बंदोबस्ताला न जुमानता दरेकर यांनी लोकलमधून आपला प्रवास सुरू केला. यावेळी प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी, दरेकर यांच्यासोबत त्यांचा स्टाफ यांनीही त्यांच्यासमवेत लोकलमधून प्रवास केला. चर्चगेट ते चर्नी रोड दरम्यान दरेकर यांनी लोकल प्रवास केला. चर्नी रोड रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी काही प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी धक्काबुक्की केली. यावेळी रेल्वे टीसीने दरेकर यांच्यासमवेत असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना विनातिकीट प्रवास केल्याबद्दल २६० रुपयांचा दंड आकारला. हा दंड रीतसर भरण्यात आला.

रेल्वे पोलिस व रेल्वे टीसी यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घातली व त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या या दडपशाहीचा दरेकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला. पोलीस, रेल्वे प्रशासन त्यांचे काम करत आहेत, त्याला आमचा विरोध नाही. पण धोरणावर आमचा आक्षेप आहे. असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, लसीकरण केल्यानंतर विमान, एसटी, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी यातून प्रवासास परवानगी आहे, मग लोकलमध्ये का नाही ? असा सवाल उपस्थित करत सामान्यांसाठी लोकलमुभा मिळेपर्यंत सविनय कायदेभंग सुरूच ठेवणार, असा  इशाराही त्यांनी दिला.

नोकरदारांच्या दृष्टीने रेल्वेसेवेवर त्यांचा काम धंदा अवलंबून आहे. त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य लोकांना रेल्वे प्रवास करू द्यावा, अशी मागणी यापूर्वीही अनेकदा केली आहे. तरीही सरकार झोपल्याचे सोंग घेत आहे. कालच मुंबई उच्च न्यायालयानेही लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करण्याची सूचना केली आहे. सरकार लोकल का सुरू करत नाही? सर्वसामान्यांनी काय घोडे मारले आहे? त्यांनी कोणते पाप केले आहे?  असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *