Breaking News

एसटी कर्मचाऱ्यांच्या अजय गुजर यांच्या संघटनेकडून संप मागे, पण कर्मचारी ठाम संप नाहीतर हा तर आमच्यासाठी दुखवटा: कर्मचाऱ्यांच्या भावना

मराठी ई-बातम्या टीम

जवळपास दोन महिने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून या संपातून अजय गुजर यांच्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने या संप मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे एसटी विलिनीकरणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात सुणावनी सुरु असताना दुसऱ्याबाजूला राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्याबरोबरील प्रदीर्घ चर्चेनंतर गुजर यांनी हा संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या घोषणेनंतर अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी कोण अजय गुजर असा प्रश्न उपस्थित करत आम्ही संप सुरुच ठेवणार असल्याचे आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांनी जाहीर केले.

आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. २२ डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजय गुजर यांची ही घोषणा महत्वाची आहे. कारण, अजय गुजर प्रणित महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेनं ही संपाची नोटीस दिली होती.

आझाद मैदान आणि राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. याबाबत विचारलं असता, कर्मचारी भावनाविवश होत आहेत. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कुणाकडून पैसे घेतले नाहीत, पैसे कुणी जमा केले हे आम्हाला माहिती नाही. आमच्यामध्ये आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात कोणतीही फूट पडलेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता चर्चा करायची नाही. आम्ही संप पुकारला होता तो आम्ही मागे घेतला आहे. २१ ऑक्टोबर रोजी संघटनेनं दिलेल्या नोटीसीनुसार ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. ५४ दिवस संप सुरु होता. २ ते ३ वेळा परिवहन मंत्र्यांसोबत बैठका झाल्या. काल शरद हवार यांच्यासोबत नवी दिल्लीत प्रदीर्घ चर्चा झाली. तेव्हा विलिनीकरणाचा मुद्दा मान्य करण्याचे त्यांनी ठरवले. विलिनीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेला लढा न्यायालयात प्रलंबित आहे. २० जानेवारी २०२२ ही समितीची मुदत तारीख आहे. न्यायालयात आज प्राथमिक अहवाल सादर झालाय. २२ जानेवारीला पूर्ण अहवाल येईल. आज आम्ही मंत्र्यांची भेट मागितली, त्यानुसार दुपारी २ वाजेपासून चर्चा झाली. विलिनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हा दोघांना मान्य असणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आत्महत्या केलेले जे ५४ एसटी कर्मचारी आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी महामंडळ लवकर निर्णय घेईल. आर्थिक मदत ५० लाख आणि कुटुंबातील व्यक्तीला तत्काळ नोकरीची आम्ही मागणी केली आहे. राज्यात कोरोना काळात ३०६ कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यांना अद्यापही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप नसून आमच्यासाठी दुखवटा आहे. आणि हे आंदोलन कोणत्याही संघटनेचे नाही, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहणार आहे. हा लढा हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे. आझाद मैदानात सध्या थंडीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक आगारातील कर्मचारी आझाद मैदानात आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप आणखी तीव्र केल्याचे दिसून येत आहे.

अजय गुजर कोण? आम्हाला माहीत नाही आणि गुणरत्न सदावर्तेंना आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आमच्या मागण्या मान्य करून घेण्याचा अजय गुजर यांना कुणी अधिकार दिला? असा सवालही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. अजय गुजर यांना सरकारकडून काहीतरी मिळाले असेल, म्हणून त्यांना संप मागे घेत असल्याची घोषणा केली असा आरोपही काही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Check Also

नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *