Breaking News

सह्याद्रीवरील ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ भारदस्त आवाज लोपला ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन

काही वर्षांपूर्वी दुरदर्शनवर मराठी बातम्यांना सुरुवात झाल्यानंतर ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ अशी धीर गंभीर आवाजात सुरुवात करत बातम्या पाहणाऱ्या प्रेक्षकाला टिव्हीसमोर खिळवून ठेवणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदिप भिडे यांचे आज मुंबईत वयाच्या ६४ व्या वर्षी आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे त्यांनी वृत्त निवेदनाचे काम केले. ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.

प्रदीप भिडे यांचे आई आणि वडील शुभलक्ष्मी व जगन्नाथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होते. विविध ठिकाणच्या शाळांमध्ये बदली होत असल्याने प्रदीप यांचे शिक्षण महाराष्ट्रातील पाच ते सहा खेडेगावांतून झाले. अकरावी एसएससी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ‘रानडे’मधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासूनच घरातून झाले होते. आई व वडील दोघेही संस्कृत, मराठी व हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास, क्रमिक पाठय़ पुस्तकांबरोबरच अन्य अभ्यासेतर पुस्तकांचे वाचन होतेच. पण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दररोज मोठय़ा आवाजात म्हटलाच पाहिजे, असा घरातील दंडक होता. ‘विष्णुसहस्रनाम’ही म्हटले जायचे. त्यामुळे शुद्ध व स्पष्ट शब्दोच्चार व्हायला आणि ‘आवाज’ घडायला त्याची त्यांना मोलाची मदत झाली.

२०१७ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रदीप भिडे यांनी, मुंबई दूरदर्शन केंद्रावर ‘वृत्तनिवेदक’ म्हणून झालेल्या प्रवेशाच्या आठवणींचा पट उलगडा होता. त्यावेळी त्यांनी, “आकाशवाणी किंवा दूरदर्शनकडे माझा ओढा होताच. तिथे आपण काम करावे असे वाटत होते. ‘रानडे’मध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत असताना मुंबई दूरदर्शन केंद्रावर उपसंचालक असलेले ल. गो. भागवत हे आम्हाला ‘दूरदर्शन’ हा विषय शिकवायला यायचे. आमच्यापैकी कोणाला दूरदर्शन केंद्रावर काम करायची इच्छा असेल तर त्यांनी जरूर येऊन भेटावे, असे सांगितले होते. त्यानुसार मी भागवत यांना भेटलो. दूरदर्शनवर माझी सुरुवात ‘प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक’ म्हणून झाली. हे काम करत असतानाच्या काळात मुंबई दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक शास्त्री यांनी माझा आवाज ऐकून तू बातम्या का वाचत नाही? अशी विचारणा केली. माझ्यासाठी ती संधी होती. ‘वृत्तनिवेदक’ पदासाठी रीतसर ‘ऑडिशन’ दिली आणि या पदासाठी माझी निवड झाली. मुंबई दूरदर्शन केंद्र १९७२ मध्ये सुरू झाले आणि १९७४ च्या डिसेंबर महिन्यात मी वृत्तनिवेदक म्हणून माझे पहिले बातमीपपत्र वाचले. गोविंद गुंठे हे तेव्हा बातम्यांचे निर्माते होते. पहिले बातमीपत्र जेव्हा वाचले तेव्हा सुरुवातीला मला अक्षरश: घाम फुटला होता. आपण बातम्या नीट वाचू की नाही अशीही मनात भीती वाटत होती. पण सुरुवातीच्या काही मिनिटांनतर दडपण दूर झाले आणि मी बातमीपत्र सादर केले. आता नेमक्या कोणत्या बातम्या वाचल्या ते आठवत नाही. पण पहिलेच बातमीपत्र छान आणि व्यवस्थित सादर झाले, अशी पावती मला मिळाल्याची आठवण सांगितली होती.

भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते. नाटकाच्या या पाश्र्वभूमीचा दूरदर्शनवर बातम्या वाचण्यासाठी मोठा फायदा झाल्याचे भिडे सांगायचे. ‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्यांनी ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून काही काळ नोकरीही केली. त्या कामातील साचेबद्धपणाचा कंटाळा आल्याने आणि स्वत:च्या ‘आवाजा’वर आर्थिक प्राप्ती करता येईल याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्या काळात नोकरी सोडण्याचे धाडस केले. पत्नी सुजाता यांनीही भिडे यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वत:ची एक इमारत होती. तिथे त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ, निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसविला आणि स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती, माहितीपट-लघुपट यावर आपला ‘आवाज’ ठसविला. भिडे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना ‘आवाज’ दिला असून सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *