Breaking News

केतकी चितळेला मिळाली न्यायालयीन कोठडी, मात्र दोन ठिकाणचे पोलिस घेणार ताबा सध्या गोरेगांव पोलिसांच्या ताब्यात नंतर पिंपरी चिंचवड आणि देहू रोड पोलिस घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंदवित अटक केली. सुरूवातीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज ठाणे न्यायालयाने सुनावली. मात्र गोरेगांव पोलिस ठाण्यातही चितळे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने गोरेगांव येथील पोलिसांनी तिचा ताबा घेतली. मात्र राज्यातील अन्य दोन पोलिस ठाण्याकडूनही तिला ताब्यात घेण्यासाठी वेटींगवर असल्याचे कळते.
आज केतकीची पोलीस कोठडी संपल्यानंतर देहूरोड पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात हजर होते. मात्र, त्याआधीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांआधी गोरेगाव पोलीस तिच्या अटकेसाठी तयार होते. त्यामुळे आधी गोरेगाव, नंतर पिंपरी चिंचवड आणि त्यानंतर देहूरोड पोलिसांकडून आता केतकी चितळेला अटक केली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये ‘तुका म्हणे’, या शब्दांचा वापर केल्यामुळे संत तुकाराम महाराज संस्थानने तिच्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
केतकी चितळेच्या त्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवरून त्यावर सर्वच स्तरातून आणि पक्षांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. राज्यात १० विविध ठिकाणी केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला रविवारी दुपारी चौकशीनंतर ठाणे क्राईम ब्रँचनं अटक केली होती. त्यानंतर तिची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
केतकीला कळंबोलीमधून अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी देखील धाड टाकून तपास केला होता. यामध्ये केतकीचा लॅपटॉप आणि इतर काही वस्तू पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून ताब्यात घेतल्या आहेत. केतकीच्या अटकेनंतर तिच्या विरोधात जशा प्रतिक्रिया उमटत आहेत, तशाच काही तिच्या समर्थनार्थ देखील येत आहेत.
रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केतकीनं न्यायालयात स्वत:ची बाजू स्वत: मांडल्याचं सांगत याबद्दल तिला मानलं पाहिजे, असं म्हटल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचवेळी तृप्ती देसाई यांनी देखील केतकी चितळेनं शरद पवारांचं नाव घेतलेलं नाही असं म्हणत तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर देखील टीका झाली.

Check Also

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *