Breaking News

नाशिक शिर्डी महामार्गावरील अपघातात १० जणांचा मृत्यूः मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखाची मदत खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, अपघाताच्या चौकशीचे निर्देश

मुंबईहून शिर्डीला चाललेल्या भाविकांच्या खाजगी बस आणि ट्रकची समोरासमोर ध़डक होऊन झालेल्या दुर्घटनेत १० भाविकांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. हा अपघात नाशिक- शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झाला. अपघात झालेल्या मार्गावर दुभाजक असतानाही खाजगी बस आणि ट्रक आमने-सामने कसे आले असा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या वारसांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली. तर जखमींवर शासकिय खर्चातून उपचार करण्याचे निर्देश दिले.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथील सद्गुरू पॅकेजिंग कंपनीतर्फे कामगार आणि कुटुंबियांना एकूण १५ बसमधून दर्शनासाठी शिर्डी येथे नेले जात होते. त्यातील पाचव्या क्रमांकाच्या बसला अपघात झाला. कल्याण येथील गाईड ट्रॅव्हल कंपनीची ही बस आहे. बस सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ईशान्येश्वर मंदिराच्या कमानीजवळ आली असता ट्रकशी समोरासमोर धडक होऊन बस उलटली. अपघात इतका भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णत: कापली गेली. यामध्ये १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३४ हून अधिक प्रवासी जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांसह वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, शिर्डीकडे मार्गस्थ होताना रस्त्यात हॉटेलमध्ये थांबलेल्या काही प्रवाशांनी बसमध्ये अदलाबदल केली होती. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास विलंब लागत आहे. सकाळपर्यंत मृतांमधील सहा जणांची ओळख पटली असून ते उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.

निधी उबाळे (९), माया जाधव (३५), प्रशांत मेहती (३५), सिमा लोले (४०), सपना डांगे (२८), हर्षद वाडेकर (१४), धनिशा वाडेकर (सहा), श्रविण्या वारकर (पाच), आशा जयस्वाल (४३), जिगर कहर (१३), बबलीदेवी कहर (३३), योगिता वाडेकर, रंजना कोठले (४०), सुप्रिया बाहीहीत, क्षुणिका गोंधळे (४२), वर्षाराणी बेहेरा (३१) हे जखमी झाल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली. त्यातील तीन जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *