Breaking News

कांदळवनाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबईत लवकरच पथदर्शी प्रकल्प महाप्रित कंपनी व इर्न्व्हामेंटल रिसर्च फौंडेशनचा पुढाकार

जैवविविधतेच्या दृष्टीने कांदळवनाचे (मॅन्ग्रोव्हस) महत्त्व अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि प्रकल्प मॅन्ग्रोव्ह सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एक पथदर्शी प्रकल्प लवकरच होणार आहे. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व इर्न्व्हामेंटल रिसर्च फौंडेशन यांच्या वतीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या संबंधित इतर एजन्सींमधील समन्वय सुलभ होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, ‘महाप्रित’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, निवृत्त सनदी अधिकारी तथा ERAF चे संचालक अजित कुमार जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, मॅन्ग्रोव्ह सेलचे एम. आदर्श रेड्डी, ‘महाप्रित’चे मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण) एस. सी. कोल्लूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे कांदळवनाचा ऱ्हास हे मुंबई शहरासाठी चिंतेचे कारण बनले आहे. विशेषत: समुद्राची वाढती पातळी आणि त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून शहराला वाचविणे गरजेचे आहे. किनारपट्टीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने कांदळवनाचे महत्त्व नाकारता येणार नाही. अनियोजित विकास, कचऱ्याची अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट, विशेषत: किनारपट्टीच्या भागात आणि कांदळवनाची झाडे जाळणे ही या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. या प्रकल्पाद्वारे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (MSW) आणि कांदळवनाच्या अधिवासातून बांधकाम आणि विध्वंस (C&D) कचरा काढून त्यांचे पुनर्वसन सुलभ करण्यासाठी योजना विकसित केली जाणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर प्रभागातील कांदळवनाच्या हॉटस्पॉटसाठी प्रस्तावित आहे. या प्रकल्पामध्ये MSW आणि C&D कचऱ्याचे प्रमाणीकरण, कांदळवनापासून कचरा काढून टाकण्यासाठी योजना विकसित करणे आणि मोक्याच्या ठिकाणी चेकपोस्ट – ‘चौकी’ स्थापन करून पुनर्वसित ठिकाणी या कचऱ्याचे भविष्यात डंपिंग रोखणे यांचा समावेश आहे. योग्य पद्धतीने योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी संबंधित विभाग आणि एजन्सींचे समन्वयन हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या, कांदळवनाच्या संवर्धनाचे महत्त्व आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कांदळवन संवर्धन समितीची भूमिका विषद केली. कांदळवनातील कचरा काढण्याची कोणतीही योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या समितीकडे सादर केल्यास ती लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल, अशी सूचना त्यांनी केली.
‘महाप्रित’चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी महाप्रित आणि EARF यांनी राबवलेल्या कांदळवन संवर्धन प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रकल्प रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात घेण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली. महाप्रित कंपनीची पार्श्वभूमी आणि उपक्रम याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
ERAF चे संचालक अजित कुमार जैन यांनी कांदळवन संवर्धन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सादरीकरण केले. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात निदर्शनास आणल्याप्रमाणे देशभरात आढळून आलेले हवामान बदल आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत असामान्यपणे वाढ होत असताना कांदळवनाचे संवर्धन करण्याची निकड त्यांनी नमूद केली.

Check Also

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *