Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ९० दिवसात मुंबईचा कायापालट स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यशवतंराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० – कचरामुक्त शहरे या तसेच घनकचरा आयसीटी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत सहकार्य करणाऱ्या संस्थांशी सहकार्य करारांची देवाण – घेवाणही यावेळी झाली. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत शहरांसाठी शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेबाबत स्पर्धेची घोषणाही यावेळी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मान्यवरांनी यावेळी स्वच्छता अभियानअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची तसेच विविध प्रकल्प व यंत्रणांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानेच गाव आणि शहरांचा विकास होतो हे आपण पाहिले आहे. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गावागावांत स्वच्छतेचे महत्त्वाचे काम करणारे स्वच्छतादूत हेच महाराष्ट्राचे खरे ब्रँड अँबेसिडर आहेत. देशात स्वच्छतेची चळवळ आता रुजली आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा ठरत असून इच्छाशक्तीद्वारेच ही कामे साध्य होऊ शकणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० राज्यात सुरू होत आहे. या अभियानाद्वारे शहरे स्वच्छ व सुंदर आणि कचरामुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावरही भर द्यावा लागेल. याद्वारे महापालिकांना उत्पन्नही मिळू शकेल. नागपूर महापालिकेने यासंदर्भात सर्वोत्कृष्ट काम केले आहे.

सर्व प्रकारचा कचरा ही आता समस्या नसून हाच कचरा आता भांडवल ठरणार आहे. घनकचरा तसेच या सर्वच प्रकारच्या कचऱ्याच्या सुनियोजित व्यवस्थापनाद्वारे खत निर्मिती आणि अन्य बाबीही उत्पादित होऊ शकतात. उल्हासनगर महापालिकेने राबविलेला गटार स्वच्छतेसाठीचा रोबो प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यामुळे गटारांमध्ये उतरून स्वच्छता करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळत आहे. अशाच प्रकारची नाविन्यपूर्ण कामे आणि उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० याअंतर्गत राबविण्यात यावीत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० मधील कामे टिकाऊ आणि दर्जेदार पद्धतीचीच झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

९० दिवसात मुंबईचा कायापालट

येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचे अभियानही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत ४५० रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून लवकरच सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. मुंबईतील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही विशेष भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *