Breaking News

मुंबईच्या उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोच्या तिन्ही मार्गास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 च्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या मार्गाची एकूण लांबी 9.209 किमी आहे. यापैकी 8.529 किमी उन्नत तर 0.68 किमी भुयारी मार्ग आहे. यामध्ये एकूण 4 उन्नत स्थानके असतील. प्रकल्पाची किंमत सुमारे 4 हजार 476 कोटी रुपये इतकी आहे. मार्च 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीए व राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसहाय्य घेण्यासाठीही मान्यता देण्यात आली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी 14 लाख 32 हजार दैनंदिन प्रवासी सीएसएमटी-वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख-शिवाजी चौक (मिरा रोड) या मार्गाचा वापर करण्याची शक्यता असून 2031 पर्यंत ही संख्या 21 लाख 62 हजार होईल, असा अंदाज आहे. वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे-घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, बोरिवली, मिरा-भाईंदर, ठाणे ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तुळ पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
वडाळा-सीएसएमटी मेट्रो मार्गास मान्यता
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई मेट्रो मार्ग-11) या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या मार्गाची एकूण लांबी 12.774 किमी आहे. पैकी वडाळा ते शिवडी 4 किमीचा उन्नत मार्ग तर शिवडी ते सीएसएमटी 8.765 किमीचा भुयारी मार्ग असेल. यामध्ये 2 उन्नत आणि 8 भूयारी अशी एकूण 10 स्थानके असतील. या प्रकल्प पूर्णत्वाची किंमत सुमारे 8 हजार 739 कोटी रुपये इतकी आहे. मार्च 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्या सहयोगातून प्रकल्प पूर्ण केला जाईल. तसेच जागतिक बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था इत्यादी आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज सहाय्य घेणे या बाबींना मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.
या मेट्रो मार्गाचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होणार आहे. हा मार्ग घड्याळ गोदी, मुंबई जनरल पोस्ट ऑफिस व मुंबई महानगरपालिका या ऐतिहासिक वारसा इमारतींच्या बाजुने भूमिगत स्वरुपात जाणार आहे. हे लक्षात घेता मुंबई पुरातन वारसा जतन समितीकडून (मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी) लवकरात लवकर मंजुरी देण्याची शिफारसही मान्य करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी मेट्रो प्रकल्प हा मेट्रो मार्ग 4 (वडाळा ते कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली ते गायमुख) यांचा दक्षिणेकडे विस्तारित होणारा भाग आहे. वडाळा ते सीएसएमटी प्रकल्पामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकसित परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच सीएसएमटी हे थेट ठाणे-घोडबंदर व मिरा-भाईंदरला जोडले जाणार आहे. त्यासोबत मेट्रो 3 चे सीएसएमटी स्थानक, हार्बर रेल्वेचे शिवडी स्थानक आणि मोनारेलचे भक्ती पार्क स्थानक येथे प्रवाशांना मार्ग अदलाबदल करणे सहज शक्य होणार आहे.
वडाळा ते सीएसएमटी मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण मेट्रो मार्गिका म्हणजे सीएसएमटी- वडाळा-कासारवडवली-गायमुख या प्रकल्पावर प्रारंभी 11 लाख 60 हजार दैनंदिन प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज असून 2031 पर्यंत ही संख्या 16 लाख 90 हजार होईल, असा अंदाज आहे.
कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाची एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणी
कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग 12) सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या मार्गाची एकूण लांबी 20.75 किमी असून हा संपूर्ण उन्नत मार्ग असेल. यामध्ये एकूण 17 स्थानके असतील. या प्रकल्प पूर्णत्वाची किंमत सुमारे 5 हजार 865 कोटी रुपये इतकी आहे. मार्च 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्यासह सिडको आणि एमआयडीसी यांचाही सहभाग असणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली या शहरांची वाढती लोकसंख्या आणि आजुबाजूला होणारा विकास, 27 गावांचा विकास आराखडा, कल्याण ग्रोथ सेंटर, नैना क्षेत्र, कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. परिणामी, या मार्गामुळे कल्याण, तळोजा, नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मेट्रो 5 ठाणे-भिवंडी-कल्याण, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो 12 कल्याण ते तळोजा यांचे एकात्मिकरण करण्याचेदेखील प्रस्तावित आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *