Breaking News

मुंबईतील केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुर्नविकासासाठी लवकरच चर्चा पश्चिम क्षेत्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे निर्देश

मुंबईतील केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी संबंधित विभागांसोबत राज्याची बैठक घेऊन लवकर तोडगा काढण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत याबाबत मागणी केली होती.

गांधीनगर (गुजरात) येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची २३ वी बैठक आज पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेत राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेसह मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रश्नावर भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीसांसह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गोव्याचे मंत्री विनोद पालिनकर, दीव-दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आदी या परिषदेस उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या विविध ११ विभागांची मिळून मुंबईमध्ये एकूण ५१७ एकर जमीन आहे. यातील काही ठिकाणी असलेल्या जमिनींचा झोपडपट्टी पुनर्विकासाशी संबंध येतो. अशा प्रकरणांमध्ये त्वरित मार्ग काढून झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न सुटावेत, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेला विनंती केली. या समस्येचे लवकर निराकरण करण्यासाठी केंद्रातील सर्व संबंधित मंत्रालयांची महाराष्ट्र सरकारसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करताना, मिठागरे जमिनींचा विकास करण्याविषयीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्राच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

पेसा कायद्यांतर्गत तरतुदींची अंमलबजावणी, राष्ट्रीय महामार्गांवरील सरकारी रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सुविधा विकसित करण्यासाठी क्षमता बांधणी, संपूर्ण लसीकरण यासह इतर विविध विषयांवर परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. एकूण ११ पैकी ९ मुद्यांवर समर्पक तोडगा काढण्यात आला.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *