Breaking News

बिदरच्या धर्तीवर मुंबईतील शाळा चालकांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
बिदरमधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकता कायद्याविरोधात (सीएए) नाटक सादर केल्यावरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्याच धर्तीवर मुंबईतील शाळकरी मुलांना सीएएच्या समर्थनासाठी वेठीस धरणारे शाळा व्यवस्थापन, आयोजक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
भाजपशासित राज्यात सीएएविरोधात बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. बिदरमध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र मुंबईत भाजपा सीएएच्या समर्थनासाठी शाळकरी मुलांना वेठीस धरते तर त्यांवरही त्याच न्यायाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जेएनयूमध्ये सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी पोलिसांसमोर प्राणघातक हल्ले केले. त्यानंतरही कारवाई केली नाही. अतिरेक्यांची साथ देणारा पोलीस अधिकारी दविंदरसिंहला अटक होते, पण त्याच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही, यातून भाजपाच्या कथित देशप्रेमाचा मुखवटा गळून पडताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपाशासित राज्यात भाजपाविरोधात बोलणाऱ्यांवर विशेषतः सीएए विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते. सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध करणाऱ्यांना भाजपाचे मंत्री अनुराग ठाकूर सरळसरळ गोळ्या घालण्याची भाषा करतात. तर खासदार प्रवेश वर्मानी शाहीन बागेतील सीएए विरोधक तुमच्या घरात घुसुन बलात्कार करतील अशी हीन दर्जाची भाषा वापरली. विरोधकांना थेट पाकिस्तानात पाठवण्याची भाषा तर सर्रास केली जाते, परंतु यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार तर विरोधी आवाज बंद करण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट तर थेट बदला घेण्याची धमकीच देतात. संघ विचार आणि विरोधक यांच्यात सरळ भेदभाव केला जात असल्याचे दिसते. कालच शाहिन बाग मधील आंदोलकांवर गोळीबार होताना स्वस्थपणे पाहणाऱ्या पोलिसांना जामिया मिलिया विद्यापिठात आक्रमक होताना देशाने पाहिले. भाजपाशासित कोणत्याच राज्यात राजधर्म पाळला जात नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Check Also

१४, २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या या तारखेला प्रसिध्द होणार राज्य निवडणूक आयोग लागले निवडणूकीच्या कामाला

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *