Breaking News

नाशिक गुन्हेप्रकरणात नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा तुर्त दिलासा १७ सप्टेंबर पर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणात १७ सप्टेंबर पर्यत कोणतीही कारवाई करून नये असे आदेश नाशिक पोलिसांना देत मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांना तात्पुरता दिलासा दिला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी महाड न्यायालयाने त्यांना अटी व शर्तीवर काल रात्री जामीन दिला. तर नाशिक पोलिसांनी राणे यांना आज नोटीस २ सप्टेंबर पर्यत हजर राहण्याची नोंटीस बजाविली. त्यामुळे राज्याच्या विविध भागात दाखल करण्यात आलेले एफआयआर रद्द करण्याविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल करण्यात आली. तसेच यावर तातडीने सुणावनी घ्यावी अशी मागणीही राणेंच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार यावर सुणावनी घेताना न्यायालयाने वरील आदेश दिले.

राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी,  अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना याचिकेची प्रत मिळाली आहे की नाही, याची खातरजमा करून अडीच वाजेपर्यंत माहिती देण्यास सांगितले. ही माहिती देण्यात आल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात येऊन नारायण राणे यांना तात्पुरता दिलासा दिला.

नाशिकमध्ये दाखल झालेल्या प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत राणे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही. तोपर्यंत राणे यांनी कोणतीही आक्षेपार्ह विधाने करू नयेत. ज्यामुळे आम्हाला कारवाई करणे भाग पडेल, असा युक्तीवाद सरकारी वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात केला.

त्यावर तसे केल्यास याचिकाकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखे होईल, असा युक्तीवाद राणेंच्या वतीने अॅड. सतीश मानेशिंदे यांनी केला. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. इतर एफआयआरनाही आव्हान देता यावे, यासाठी याचिकेत दुरूस्ती करण्याची मुभा राणेंच्या वकीलांना न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. तसेच भाजपा आणि शिवसैनिकांमध्ये काही ठिकाणी राडेबाजीही झाली. याप्रकरणी राणे यांनी कालच मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत जामीन अर्ज करत दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची याचिका दाख केली होती. मात्र ती याचिका व्यवस्थित नसल्याने तुम्ही प्रक्रिया पूर्ण करून याचिका दाखल करा आम्ही त्यावर सुणावनी घेवू असे न्यायालयाने स्पष्ट करत तातडीने निर्णय देण्याचे टाळले होते. त्यानुसार रितसर न्यायालयात आज राणे यांच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आणि त्यानंतर दुपारी याबाबत सुणावनी घेण्यात आली. दरम्यान महाड येथे दाखल गुन्ह्यात सत्र न्यायालयाने रात्री उशिरा राणे यांना अटी व शर्तींवर जामीन दिलेला आहे.

Check Also

शिवसेना उबाठा गटाने यादी जाहिर करताच काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

जवळपास मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *