मुंबईः प्रतिनिधी
मागील दोन वर्षापासून रिक्त राहिलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी अंतिम तीन नावांचा प्रस्ताव दिला असून यात डॉ.अमरजितसिंह मनहास, सुरेश शेट्टी आणि भाई जगताप यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती मुंबई काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबई काँग्रेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लावावी यासाठी पाटील यांनी नेते आणि ब्लॉक अध्यक्षांची मते जाणून घेतली होती. त्यात अनेकांनी आपापल्या परीने काही ज्येष्ठ नेत्यांची नावे पुढे आली होती. मात्र यातील बहुतांश जणांनी डॉ.अमरजितसिंह मनहास, भाई जगताप आणि सुरेश शेट्टी यांच्या नावाला पसंती दिली.
त्यामुळे एच.के.पाटील यांनी या तीन नावांचा प्रस्ताव तयार करून आज काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेवून या तीन जणांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर साधारणतः आठवडाभरात निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
