मुंबईः प्रतिनिधी
मागील दोन वर्षाहून अधिक काळ मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त ठेवल्यानंतर आगामी महापालिका निवडणूकांवर नजर ठेवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अमराठी चेहरा देण्यासंदर्भात गंभीर चर्चा पक्षश्रेष्ठींमध्ये सुरु असल्याची चर्चा विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष पदी कोणत्या कोणाची वर्णी लागावी यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी नुकतेच पक्षाचे नेते, ब्लॉक अध्यक्ष यांच्याशी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पध्दतीने चर्चा केली. त्यावेळी या सर्वांनीच भाजपाची रणनीतीला तगडे उत्तर देईल असा नेता मुंबई अध्यक्ष पदी असावा अशी मागणी केली. त्यादृष्टीने ब्लाक अध्यक्षांनी वेगवेगळ्या नावाला पसंती दर्शविली असली तरी पसंती दर्शविलेल्या नेत्यांमध्ये क्षमतेचा अभाव असल्याचे जाणवल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे गेली कैक वर्षे पडद्यामागून मुंबईतल्या राजकारणात महत्वाची भूमिका बजाविणारे आणि स्व.गुरूदास कामत यांचे विश्वासू सहकारी राहीलेले अमरजित मनहास या अमराठी चेहऱ्याला संधी देण्याबाबत काही जणांनी सुचविले. त्यांना संधी दिल्यास भाजपाच्या बिगर मराठी मतांना वळविण्यास मदत होईल आणि थोडे आक्रमक पध्दतीचे नेतृत्वही काँग्रेसला मिळेल अशी आशा काही ब्लॉक अध्यक्षांनी व्यक्त पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
इतर मराठी आणि अमराठी नेत्यांच्या तुलनेत मनहास यांचा जनसंपर्क दांडगा असून प्रतिमाही निस्पृह अशी आहे. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देण्यास काय हरकत आहे अशी विचारणाही काहीजणांकडून व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
