Breaking News

एमपीएससी सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार: लोणकर कुटुंबियांना मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी करण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. तर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली.
सभागृहाचा पहिला दिवस असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ही बाब वेदनादायी आहे. अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये, अशी सरकारची भूमिका आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचं की, स्वप्निल लोणकर याने २०१९ मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली. परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. या परीक्षेत ३,६७१ उमेदवार पात्र ठरले. १२,०० पदांसाठी ही परीक्षा झाली होती. दरम्यान, एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. याच दरम्यान, कोविडची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला. स्वायत्तता दिलेली असली, तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहाला दिली.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील असल्याचे सांगितले. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *