मुंबई: प्रतिनिधी
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता.
मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर संध्याकाळी मात्र चांगलाच मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. मुंबई महानगरात नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, बोरीवली, मीरा-भाईंदर भागात पावसाने चांगलीच उपस्थिती लावली.
याशिवाय राज्यातील हरनाई, अहमदनगर, औरंगाबाद, गोंदीया, नाशिक सिंधुदूर्ग, पुणे, नाशिक, बीड, लातूर जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. तसेच या भागातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशाराही विभागाने दिला.
