Breaking News

मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू अग्निरोधक यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई : प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊडमध्ये हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू तर १४  जखमी झाले असून सर्वांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की  तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीच्या निमित्ताने मुंबईतील सर्वच इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजो बिस्त्रो पबमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या परिसरात रेस्टॉरंट्स आणि पब आहेत. पबमध्ये पार्टी सुरू असताना हा प्रकार घडल्याचं समजत असून मृत्यूमुखींमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

याच इमारतीत इतरही काही ऑफीस आहेत. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास लागलेली आग अग्नीशमन दलाच्या साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझली. घटनास्थळी मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. घटनेत मृत्यू झालेल्यांची ओखळ अद्याप पटलेली नसून जखमींवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शहरात मोठमोठ्या इमारती आणि चकचकीत हॉटेल-रेस्टॉरंट उभारण्यात येणाऱ्या सर्वच ठिकाणच्या अग्निरोधक यंत्रणांचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिका हद्दीतील सर्वच इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा असायला हवी असा कायदा असतानाही अग्निरोधक यंत्रणा बसविण्याची काळजी या व्यावसायिकांकडून घेतली जात नसल्याचे दिसून येते. मुंबई महापालिकेकडून या अशा पळवाट काढणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असून पालिकेच्या पाठीशी घालण्याच्या वृत्तीमुळे निष्पापांचा मृत्यू जात आहे.

या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ८ जण अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे

प्रमिला, तेजल गांधी ( वय-३६), खुशबू बन्सल, विश्व लालानी (वय-२३), पारूल लाकडावाला (वय-४९), धैर्य लालानी (वय-२६), किंजल शहा (वय-२१), कविता धरणी (वय-३६), शेफाली, यशा ठक्कर (वय-२२), सरबजित पारेला, प्राची खतानी (वय-३०), मनिषा शहा (वय-४७), प्रीती राजगिरा (वय-४७)

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *