मुंबईः प्रतिनिधी
MMRDA ची आर्थिकस्थिती ढासळू लागल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी सुरक्षा योजना आणि सेवानिवृत्ती नंतर वैद्यकीय सुविधा बंद केल्याने अधिकारी कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्राधिकरण आयुक्त आर.ए.राजीव यांनी कर्मचारांच्या अधिकार आणि हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप करत एमएमआरडीए ऑफिसर्स असोसिएशनने कर्मचाऱ्यांनी बुधवारी थेट आंदोलन केले.
यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या, प्राधिकरण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…बाहेरचे हटाव, प्राधिकरण बचाव..या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी सुरक्षा योजना आणि सेवानिवृत्ती नंतर वैद्यकीय सुविधा बंद केल्या. तसेच बाहेरील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना विविध विभागातील प्रमुख पदांवर दिलेली नियमबाह्य नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत अशा अनेक अन्यायकारक गोष्टी एमएमआरडीए आयुक्त करत आले आहेत. तसेच गेल्या तीन वर्ष्यापासून कर्मचारी संघटना महानगर आयुक्तांकडे चर्चेसाठी वेळ मागत आहे. मात्र आयुक्त आर.ए.राजीव हे गेले ३ वर्षे कर्मचारी संघटनेला भेटण्यास आणि चर्चेला तयार नाहीत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केल्याचे ऑफिसर्स असोसिएशन संघटनेचे सिद्धार्थ सत्वधीर, शांताराम चाळके यांनी सांगितले.
प्राधिकरणाला मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेतलेल्या विविध प्रकल्पासाठी असलेल्या कर्जांपेक्षा आणखी हजारो कोटीचे कर्ज घ्यावे लागणार आहे. एमएमआरडीएची अर्थव्यवस्थे ढासळण्याच्या परिस्थितीत असल्याबाबत या आंदोलनात चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच आयुक्त आर ए राजीव यांनी एकदाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबधी संघटनेला वेळ दिला नाही, द्वार सभेची पूर्वसूचना देऊन सुद्धा त्याची दखल घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, संघटनेच्या आंदोलनाला कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आणि विविध कामगार संघटना आणि नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आल्याचा दावा संघटनेने केला.
