Breaking News

वेतन वाढ करा, आमदारांच्या स्वीय सहायकांचे विधानसभेच्या उपाध्यक्षांना साकडे मागणीची दखल घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी पाठविली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आता स्वीय सहायकांनीही आपल्या वेतन वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या केल्या. या मागणीसाठी सर्व आमदारांच्या स्वीय सहायकांनी थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भेटून यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले.
गेल्या काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून सध्या मिळत असलेल्या मानधनात घर खर्चाबरोबर इतर आवश्यक खर्च बसविणे अवघड बनत चालले आहे. तसेच स्वीय सहायकांना कोणत्याही स्वरूपाचे लाभ किंवा सुविधा मिळत नसल्याने किमान सहायकांना जीवन आरोग्य विम्याचे कवच मिळावे, स्वीय सहायकांच्या वेतनात वाढ व्हावी, बस प्रवास मोफत करावा तसेच निवृत्ती योजना लागू करावी अशी मागणी या स्वीय सहायकांनी एका लेखी निवेदनाद्वारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.
त्यावर उपाध्यक्ष झिरवळ यांनीही स्वीय सहायकांच्या मागण्यांची दखल घेत या तिन्ही मागण्या मान्य कराव्यात यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांना मान्य करण्याबाबत शिफारस केली आहे.
राज्यातील प्रत्येक आमदारांच्या स्वीय सहायकाचे वेतन-मानधन राज्य सरकारकडून देण्यात येते. त्यासाठी आमदारांना देण्यात येणाऱ्या मासिक वेतन व भत्ते यामध्ये स्वीय सहायकांचे वेतन समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु स्वीय सहायकांना मिळणारे वेतन हे विद्यमान परिस्थितीत फारच कमी असल्याने या स्वीय सहायकांची परवड होत आहे. त्यामुळे वेतन-मानधनात वाढ करावी अशी मागणी करण्यात आल्याचे एका स्वीय सहायकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *