Breaking News

MissionBeginAgain जीवघेणे ठरत असेल तर पुन्हा लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याच्यादृष्टीने मिशन बिगीन अगेन जाहीर करण्यात आले. मात्र मुंबईसह अनेक ठिकाणी शाररीक अंतर पाळले जात नाही. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी, प्रवासात योग्य अंतर न राखणे या गोष्टी होताना दिसत आहेत. जर हि शिथीलता जीवघेणी ठरू लागली तर पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला.
निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला. त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
करोनासोबत जगायला शिका असं जगभरात सांगितलं जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली. आरोग्य खराब कऱण्यासाठी नाही. आपण एकमेकांपासून अंतर ठेवलं पाहिजे. सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते असल्याचे लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. पण महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे. जनता सरकारचं ऐकत असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्दी टाळा, कोणत्याही परिस्थिती ती होता कामा नये असं आवाहन करत आपल्याला करोनासोबत जगायला शिकलंच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे या गोष्टींचं पालन करावंच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत मुंबईत पोहोचता यावे यासाठी लोकल सुरु करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही सातत्याने लोकल सुरु करण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग वादळाने कोकणात मोठी हानी झाली आहे. मदत देण्यासंदर्भात सद्याचे निकष जून झाले आहेत. त्यामुळे या निकषात बदल करण्यात आल्याचे सांगत यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानभरपाईच्या निकषातील बदलांमुळे भरीव मदत
– नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सुचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.
बदललेल्या निकषामुळे मदतीत दीड ते ३ पट वाढ
· पक्क्या- कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १ लाख ५० हजार इतकी वाढवण्यात आली आहे.
· बहुवार्षिक पिकाच्या नुकसानभरपाई साठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती आता ती वाढवून ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल
·अंशत: पडझड झालेल्या घरासाठी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
· कच्च्याघराच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
·नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून १५ हजार इतकी करण्यात आली आहे.
· गावात लहान मोठी दुकाने, टपरी चे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते आता विशेष बाब म्हणून ही मदत वाढविण्यात आली आहे. ती कपडे व भांडी यासाठी प्रती कुटुंब प्रत्येकी ५ हजार अशी करण्यात आली आहे.
वीजपुरवठा सुरळित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
– चक्रीवादळाने रायगड-रत्नागिरी मध्ये वीजेचे खांब कोसळले आहेत, ते उभारण्याचे काम सुरु आहे. वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी इतर जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ तिथे नियुक्त करण्यात आले आहे. येथील वीजपुरवठा सुरळित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कापूस उत्पादकांचा कापूस शासन खरेदी करणार – अजित पवार
मंत्रिमंडळ बैठकीत कापूस खरेदीसंदर्भात चर्चा करण्यात आली यासंदर्भात पणनविभाग, सीसीआय सह सर्व संबंधितांची बैठक घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले ते म्हणाले की, सीसीआयने सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदीची तयारी दर्शविली होती परंतू पावसामुळे ही खरेदी तत्काळ झाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका त्यांना सांगण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस शासन खरेदी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मका, तूर, चणाडाळ, धान याची खरेदी अन्न नागरी पुरवठा व पणन विभागाकडून करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल हेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी पुराने नुकसान झालेल्या पुरग्रस्तांचे पैसे तातडीने देण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मदत पुनर्वसन विभाग यासंदर्भातील प्रस्ताव पाठवत असल्याचे ते म्हणाले. कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्या मार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. निसर्गवादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीज पुरवठा सुरळित होईपर्यंत प्रति रेशनकार्ड ५ लिटर रॉकेल मोफत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय त्यांना रेशनदुकानातून तांदुळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
यंत्रणेने परिस्थिती चांगली हाताळली- बाळासाहेब थोरात
सतर्कता काय असते हे निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने दिसून आल्याचे स्पष्ट करून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ, महसूल यंत्रणा, पोलीस आणि इतर सर्वच यंत्रणांनी निसर्ग चक्रीवादळात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. आता नुकसानभरपाईच्या रकमेत चांगली वाढ करून शासनाने नुकसानग्रस्तांना दिलासा दिल्याचेही ते म्हणाले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *