Breaking News

खुशखबर ! राज्यातील हॉटेल्स-लॉज लवकरच सुरु हॉटेल्स असोसिएशनसमवेत बैठकीत लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी
‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्वयंशिस्तही महत्त्वाची – मंत्री आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे आहे.
मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, हॉटेल्स १०० टक्के लगेच सुरु करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन करत आहोत. प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, हॉटेल्स सुरु करताना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्या-खाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे आहे.
इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले की, या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे. आज आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरित कामगार आहे. पर्यटन व्यवसायात इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते. आता काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टोरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरु करायला परवानगी द्यावी, जेणेकरुन पर्यटक जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहतील आणि येथील पर्यटन उद्योगाला वाव मिळेल.
विवेक नायर म्हणाले की, विजेची देयके कमी करावीत. हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावी. कमलेश बारोट म्हणाले की, या उद्योगाला खुले केल्यास अनेक फायदे होतील. हॉटेल्स आणि रेस्टोरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीतकमी मर्यादा असावी अन्यथा उत्पन्न आणि कर मिळणार नाही. हॉटेल्स आणि रेस्टोरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी. सध्या ६ लाख कोटींपेक्षा जास्त फटका हॉटेल्स आणि रेस्टोरंट उद्योगाला बसत आहे. विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे. फ्लाईटमध्ये प्रवाशांना ८-८ तास एकत्र बसावे लागते. हॉटेल्समध्ये एखादे कुटुंबीय सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि सुरक्षितता ठेवून येऊ शकते. टेबल्सची मांडणी त्यादृष्टीने केल्यास, स्वच्छता ठेवल्यास काहीही अडचणी येणार नाही.
एस. पी. जैन म्हणाले की, हॉटेल्समधील सुविधांचा वापर उद्योग आणि व्यवसायही करू शकतात, त्यामुळे उत्पन्न वाढू शकेल. मुंबईतील हॉटेल्स सध्या पालिकेने कोविड काळासाठी घेतल्या आहेत शिवाय काही सुविधा स्वत:हुन आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, याचा कमीतकमी मोबदला काही प्रमाणात मिळाला तर आम्हालाही येणारे खर्च भागवता येतील. पुनीत चटवाल म्हणाले की, अनेकांना त्यांच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांत कपात करावी लागत आहे त्यामुळे हॉटेल्स काही प्रमाणात सुरु केल्यास व्यवसाय वाढेल. सर्वश्री देवेंद्र भरमा, प्रदीप शेट्टी, हरप्रीत सिंग, तेज टकले यांनी देखील आपल्या सुचना केल्या.

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *