मुंबईः प्रतिनिधी
देशातील नवी दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात राज्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चारही राज्यातून महाराष्ट्रात विमान, रेल्वे आणि रस्त्याने येवू इच्छिणाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे राज्य सरकारने बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश missionbegainagain अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार ज्यांच्याकडे अहवाल असतील त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येईल अन्यथा त्यांना थेट कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात येणार असल्याचा इशाराही राज्य सरकारने नुकताच दिला.
या चार राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येवू इच्छिणाऱ्या प्रवाशाकडे महाराष्ट्रात येण्यापूर्वी ७२ तास आधी कोरोनाची आरटी-पीसीआरची चाचणी केल्याचा अहवाल असणे आवश्यक करण्यात आले आहे. जर सदर व्यक्तीकडे तसा अहवाल नसेल तर त्या व्यक्तीने आधी स्वखर्चाने चाचणी करावी आणि अहवाल निगेटीव्ह असेल तरच त्याला विमानतळावरून महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.
रेल्वेने महाराष्ट्रात येवू इच्छिणाऱ्या प्रवाशालाही हाच नियम लावण्यात आला आहे. मात्र त्याने कोरोना चाचणी ९६ तास आधी केलेली असावी असे बंधनकारक करण्यात आली आहे. तर रस्त्याने बस, चारचाकी वाहनाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक जिल्ह्याच्या प्रशासनावर सोपविली आहे. या प्रवाशांची अॅण्टीजेण्ट चाचणी निगेटीव्ह आली तरच प्रवाशांना पुढील प्रवासास मान्यता देण्यात येणार आहे. अन्यथा नाही.
