Breaking News

मंत्र्यांचे स्पष्ट संकेत, “कॉलेज-महाविद्यालये सुरू होणार मात्र या सणाच्या सुट्टीनंतर” सीईटी निकाल आणि दिवाळीनंतर सुरु होण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

आणखी तीन दिवसानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असताना कॉलेज-महाविद्यालये कधी सुरु होणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टीमुळे परिक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परिक्षा घेण्यात येत असून त्या परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर सर्व कॉलेज-महाविद्यालये सुरु करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय टास्क फोर्सबरोबरील चर्चेनंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दिवाळी सुरु होत असल्याने त्यानंतरच कॉलेज सुरु करण्याबाबत निर्णय होवू शकतो असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील संकेत दिले.

अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देता आली नाही. त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटीच्या परीक्षा झाल्याशिवाय, त्याचा निकाल लागल्याशिवाय कॉलेज सुरू करता येणार नाहीत.त्यामुळे ही परीक्षा लांबली तर महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख अजून पुढे जाईल. ज्याठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, त्या ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही. याविषयी राज्य कृती दल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कशा पद्धतीचा फॉर्मुला तयार करायचा ह्यावर विचार करुनच कॉलेज सुरू करायची आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. मात्र आपल्याकडे त्या काळात दिवाळीचा सण असल्याने त्या काळात महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. त्यानंतरच कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल. आम्ही त्या विचारात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *