Breaking News

कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीवरून वंचित आघाडीत धुसफूस स्थानिक उमेदवार देण्याची एमआय़एमची भूमिका

मुंबईः प्रतिनिधी
समाजातील वंचित घटकाला राजकिय नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जवळपास २५ हून अधिक छोटे राजकिय पक्ष वंचित आघाडीच्या एकछत्राखाली एकत्रित आले. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्या. बी.जी.कोळसे-पाटील यांना जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्याने एमआयएम पक्ष नाराज झाल्याने वंचित आघाडीत निवडणूकीपूर्वीच धुसफूस सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
माजी. न्या. बी.जी.कोळसे-पाटील हे जरी साऱ्या महाराष्ट्राला परिचित असले तरी त्यांच्या उमेदवारीला एमआयएमकडून विरोध सुरु आहे. एमआयएमचा औरंगाबादेतून आमदार असल्याने सदरची जागा एमआयएमलाच मिळावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून करण्यात येत असल्याचे एमआय़एममधील एका नेत्याने सांगितले.
त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत शंका असल्याचे मत एमआयएममधील कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सदरची जागा जनता दल पक्षाला देण्याऐवजी ती एमआयएमला द्यावी अशी मागणी जोर धरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. तसेच स्थानिक मतदारांनाही ते नको आहेत. वंचित आघाडीचा जनता दल भाग असली तरी औरंगाबादच्या जागेसाठी काँग्रेसकडूनही पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून जनता दलाचे अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा सुरु असल्याची माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.
याबाबत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोळसे-पाटील हे हुशार, अभ्यासू आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व चांगले आहे. मात्र औरंगाबादेत जर स्थानिक उमेदवार दिला तर त्याचा लाभ वंचित आघाडीला मोठ्या प्रमाणावर होवू शकतो. यासंदर्भात वंचित आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर जो आदेश देतील तो आम्ही पाळू.
वंचित आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, जनता दलाकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र त्या जागेवर एमआयएमनेही हक्क दाखविला आहे. मात्र याबाबत एमआयएमचे असोवुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा होवून त्यावर अर्ज भरण्याच्या तारखेआधी मार्ग निघेल.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *