Breaking News

दूध दराच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी अध्यक्ष बागडे यांच्या खुलाशाने सरकार अडचणीत

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दूधाचा दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र सहकारी दूध संघांना हा दर परवडत नसल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत एखादे संस्था उभारणे अवघड आहे. मात्र उध्दवस्त करणे सोपे असल्याची टीका केली. त्यावर पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांसाठीच घेतलेला असल्याने जे दूध संघ हा दर देणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

पदुम मंत्री महादेव जानकर यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने अजित पवार यांनी राज्य सरकारने ठरविलेला दर कोणत्या संघाला परवडत आहे? असा सवाल उपस्थित करत याबाबतचा थेट सवाल विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना विचारला. त्यावेळी अध्यक्ष बागडे यांनीही राज्य सरकारने ठरविलेला दर आमच्या दूध संघाला परवतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना २१ ते २२ रूपये प्रति लिटर दराने पैसे दिले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे दूध दराच्या बाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या महादेव जानकरांची चांगलीच गोची झाली.

त्यावर काँग्रेसचे सुनिल केदारे यांनी याच अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत अध्यक्षांच्या दूध संघावर काय कारवाई करणार असा उपप्रश्न उपस्थित केला. त्यावर जानकर यांनी याबाबत अधिकाऱ्यांचे एक गट जे दूध संघ शासनाने निर्धारीत केलेला दूध दर देत नाहीत त्याची माहीती घेत आहेत. त्यासंदर्भात लवकरच एक अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे गुळमुळीत उत्तर दिले.

शेवटी सभागृहात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना अजित पवार यांनी मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यातील तज्ञ आणि प्रमुख लोकांच्या उपस्थित अध्यक्ष बागडेंच्या दालनात बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

 

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *