Breaking News

कॅन्सर रूग्णांसाठी टाटा रूग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
दुर्धर अशा कॅन्सर आजारावर उपचारासाठी देशभरातील विविध भागातून मुंबईतील टाटा रूग्णालयात येतात. मात्र येथे रूग्णांच्या आप्तेष्टांना राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना परेल उड्डाणपुलाच्या खाली, फुटपाथवर कोठेही रहावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या आप्तेष्टांची सोय व्हावी यासाठी म्हाडाकडून ३०० चौ.फुटाच्या १०० खोल्या टाटा रूग्णालयास देणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली.
त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या सदनिका म्हाडाच्या आरआर अर्थात मुंबई इमारत दुरूस्ती व पुर्नरचना मंडळाला जून्या इमारतींच्या पुर्नविकासातून १८८ सदनिका उपलब्ध झालेल्या आहेत. त्यातील १०० सदनिका या टाटाला देण्यात येणार आहे. जेणेकरून रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्ण आणि त्यांचे आप्तेष्टांची सोय होवू शकणार आहे. या सदनिका करी रोड येथील हाजी कासम चाळ मालमत्तेच्या पुर्नविकासातून उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या सदनिका साधारणतः ३०० चौरस फुटाच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
टाटा रूग्णालयात दिवसाकाठी २७५ पेक्षा जास्त रूग्णासोबत आप्तेष्ठ-काळजीवाहू व्यक्ती येत असतात. तसेच त्यांच्याकडून निवासाच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली जाते. परंतु निवासाची पुरेशी सोय नसल्याने जवळपास २०० व्यक्तींना निवास नाकारण्यात येते. दिवसाकाठी केमोथेरेपी आणि रेडियेशन थेरपीसाठी ६०० च्या जवळपास रूग्ण येतात. या रूग्णांबरोबरच त्यांच्या आप्तेष्टांची सोय होणे गरजेचे असल्याने या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच या सदनिका टाटा रूग्णालयाच्या जवळ राहिल्याने त्याचा लाभही रूग्णांना होणार आहे. या सर्व सदनिकांची देखभाल आणि वाटपाची संपूर्ण जबाबदारी पूर्णपणे टाटा रूग्णालयावर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *