Breaking News

म्हाडाचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी होणार गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी

मुंबईसह महाराष्ट्रात म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम करणाऱ्या शिर्केच्या कामाची चौकशी करण्यात येणार असून त्यासाठी गृहनिर्माण विभागातील उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच २ महिन्यात या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यास आदेश दिले आहेत.

साधारणत: २० ते २५ वर्षापूर्वी अर्थात १९९३ साली राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर म्हाडाकडून मुंबईकरांसह राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वस्त-परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मिती करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतींचे काम त्यावेळी शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. तेव्हापासून याच कंपनीकडून म्हाडाच्या इमारतीं बांधण्यात येत आहेत. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील २०१४ साली राज्यात सरकार आल्यानंतर शिर्केला म्हाडाच्या कामातून हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली करण्यात आल्या. तसेच पात्रता निकषामध्येही बदल करण्यात आले. मात्र शिर्के कंपनीने केलेल्या कामाइतकी पात्रता कोणालाच सिध्द करता आली नसल्याने पुन्हा इमारतींचे काम पुन्हा शिर्के कंपनीलाच दिले.

मात्र आता पुन्हा राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहनिर्माण विभागाचे मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी या शिर्के कंपनीने केलेल्या कामाचे सर्वच पातळीवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

मागील काही वर्षापासून शिर्के कंपनीने उभारलेल्या इमारतींचे काम चांगल्या दर्जाचे होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. त्यातच त्यांनी उभारलेल्या अनेक इमारतींच्या स्लॅपमधून पावसाचे पाणी गळत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून येत आहेत. याशिवाय इमारतींचे पोल लाही तडे जात असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने शिर्केच्या संपूर्ण कामाचीच चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी  स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी गृहनिर्माण विभागाचे उपसचिव, व्हीजेआयटीतील विभाग प्रमुख, म्हाडातील मुख्य अभियंता, एसआरएचे मुख्य अभियंता, गृहनिर्माण विभागातील दोन अव्वर सचिव आदींचा समावेश या समितीत राहणार आहे.

मागील काही वर्षात शिर्केने म्हाडामध्ये प्रशासकियस्तरावर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून म्हाडातील अनेक इंजिनियरचे काम अर्थात  नकाशे तयार करण्याचे, मुंबई महापालिकेकडून परवानग्या आणण्याचे काम शिर्केकडूनच केले जाते. तसेच अनेक अभियंते शिर्केच्या साईटवर न जाताच त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सही करत असल्याचे अनेक किस्से म्हाडामध्ये सांगण्यात येतात. तसेच शिर्केने सादर केलेल्या वाढीव बिलावरही म्हाडाचे अनेक अधिकारी डोळे झाकून सही करत असल्याच्या अनेक घटना ही म्हाडात होत असल्याची चर्चाही आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *