Breaking News

गुजरातमधल्यापेक्षा राज्यातल्या निवासी डॉक्टरांना मिळणार जास्त विद्यावेतन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व ३ दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले.  यामुळे २९ कोटी ६७ लाख ६० हजार इतका वाढीव बोजा पडेल.

सेंट्रल मार्ड संघटनेने निवासी डॉक्टर २४ तास सेवा देत असल्याचे निदर्शनास आणले आहे. राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.  सध्या महाराष्ट्रात प्रतिमहा ५४ हजार, गुजरात मध्ये ६३ हजार, बिहारमध्ये ६५ हजार आणि उत्तर प्रदेशात ७८ हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते.

महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन हे ६४ हजार ५५१ पासून ७१ हजार २४७ रुपयांपर्यंत होईल. तर दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन ४९ हजार ६४८ पासून ५५ हजार २५८ इतके होईल.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती

एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी विनाअनुदानीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला.  अशा ११२ बाधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ७ कोटी ४९ लाख ३८ हजार ६०० रुपये प्रतिपूर्ती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. या संदर्भातील शासन निर्णय २० सप्टेंबर २०१९रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

एकूण ३३ कोटी ६ लाख २३ हजार ४०० इतकी प्रतिपूर्तीची एकूण रक्कम होणार आहे.  याचा लाभ ६ वैद्यकीय / दंत पदव्युत्तर ३ वर्षे कालावधीच्या पदवीसाठी तसेच ४.५ वर्षे कालावधीच्या १०६ पदवी विद्यार्थ्यांना होणार आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *