Breaking News

संदिप कुलकर्णी बनणार तानाजी डांगे

मुंबई : प्रतिनिधी

काही कलाकारांच्या उपस्थितीमुळेच चित्रपटाभोवती एक अनोखं वलय निर्माण होत असतं. प्रचंड मेहनतीने त्यांनी आजवर पडद्यावर सजीव केलेल्या व्यक्तिरेखांनी दिलेली ती जणू पोचपावतीच असते. त्यामुळेच अशा कलाकारांपुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम मानत रसिक मायबापही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे धाव घेत असतात. हिंदीसोबतच मराठी तसंच इतर भाषिक चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर असलेल्या या मराठी कलाकारांच्या यादीत संदिप कुलकर्णी हे नावही सामील आहे. संदिप कुलकर्णी सध्या ‘कृतांत’या त्याच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘कृतांत’या चित्रपटाची निर्मिती निर्माते मिहीर शाह यांनी रेनरोज फिल्मच्या बॅनरखाली केली आहे. ६ सप्टेंबर रोजी गीतध्वनीमुद्रणाने मोठ्या थाटात या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला असून सध्या वेगात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात संदिप कुलकर्णी तानाजी डांगे नावाच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना संदिप म्हणाले की, तसं पाहिलं तर ‘कृतांत’ या शीर्षकावरून या चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावणं कठीण आहे. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. कथेबाबत जास्त काही सांगता येणार नाही; परंतु या चित्रपटाचा विषय आजच्या धावपळीच्या व्यवहारीक जीवनाशी अनायसे जुळून आलेला तात्विकतेचा संबध अधोरेखित करणारा असल्याचं मात्र नक्की सांगेन. ‘कृतांत’मध्ये मी साकारलेली व्यक्तिरेखा शब्दांत सांगणं तसं कठीण असून इतक्यात ते सांगून त्यातील रहस्य उलगडणं ठीक नाही. भूमिका निवडताना मी नेहमीच चोखंदळ असतो. एका प्रकारच्या भूमिकेत मी पुन्हा कधीच दिसलो नाही. ‘कृतांत’ची ऑफर स्वीकारताना देखील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे तानाजी डांगे ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नातेसंबंध आणि आजचं जीवन हा या चित्रपटाचा गाभा असून तोच खरा या चित्रपटाचा नायक आहे असं माझं मत आहे. या चित्रपटाची कथा आजच्या काळातील असल्याने प्रत्येकाला ती आपलीशी वाटेल, प्रत्येकजण त्यातील व्यक्तिरेखेच्या जागी स्वत:ला पाहिल आणि हेच या चित्रपटाचं यश असेल असं मतही संदिपने व्यक्त केलं.

‘कृतांत’मधील तानाजी डांगे ही दमदार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तितक्याच ताकदीचा नट मिळणं ही कथेची गरज असल्याचं सांगत दिग्दर्शक दत्ता भंडारे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तिरेखेची आपली एक ताकद, ऊर्जा, उंची आणि मर्यादा असते. जो कलाकार या सर्व गोष्टींची पूर्तता करीत व्यक्तिरेखा साकारतो ती प्रेक्षकांच्या मनाला भिडते. तानाजी डांगे या व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची निवड करताना सर्वप्रथम संदिप कुलकर्णी यांचाच चेहरा डोळ्यांसमोर आला. तेच या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देऊ शकतील असं वाटलं. त्यांना जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा ते देखील आनंदाने तयार झाले. मराठीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा संदिप कुलकर्णींसारखा कलाकार जेव्हा चित्रपटात काम करायला तयार होतो तेव्हा संपूर्ण टिमलाही हुरूप येतो. त्यांच्यासोबत चित्रीकरण करतानाही एक वेगळाच अनुभव येत असल्याचंही भंडारे म्हणाले.

Check Also

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *