Breaking News

मंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

गांव देवी मंदिराच्या पुजाऱ्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अख्खा गाव गोळा झाला आणि देवळाच्या पटांगणात जमा होऊन गांव देवीने पुजाराच्या पोटाची समस्या दूर करावी म्हणून प्रत्येकजण प्रार्थना करू लागला.  पण फरक काही पडला नाही. गावातल्या तज्ञ मंडळींनी पुजाऱ्याला डॉक्टरकडे नेण्याची विनंती केली, पण पुजारी काही केल्या डॉक्टरकडे जाईना पुजाऱ्याचं म्हणणं असं होतं, ” या डॉक्टरांना देवाने निर्माण केलं त्या डॉक्टरांनी देवाच्या पुढे जाऊन माझ्या पोटावर इलाज करणं मला मान्य नाही”,  आणि ज्या देवाने माझ्यावर प्रकोप केला. आज सहा सात महिने मंदिर बंद करून जे काय या सरकारने पाप केले, त्याचे प्रायश्चित्त मी गावचा पुजारी म्हणून मलाच भोगावं लागणार. जोपर्यंत देवाचे दार उघडत नाही तोपर्यंत असंच माझ्या पोटात दुखत राहणार, गावासाठी इथे देशभरातून येणार्‍या भाविकांच्या श्रद्धेसाठी मी एवढा त्रास सहन करत नसेल तर कसली माझी श्रद्धा? ” इतका बोलल्यानंतर पुजाऱ्यांच्या पायाजवळ पूर्ण गाव नतमस्तक झाला.

गावातली जाणकार मंडळी एकत्र बसले आपण आपल्या पुजाऱ्याच्या पोटाचा विचार केला पाहिजे, त्याच्या पोटात दुखणे असंच वाढत गेलं तर पुढे अख्ख्या गावाला याचा परिणाम भोगावा लागेल. आतापर्यंत पुजाऱ्याच्या पोटावरच गांव देवीने आपल्या प्रहार थांबवला आहे. म्हणून गावाचं नशीब समजा, उद्या पुजाऱ्याचं बरं वाईट झालं तर गावातल्या प्रत्येकाच्या जीवावर बेतू शकतं.” बऱ्याच चर्चेनंतर गावातील तज्ञ जाणकार मंडळी कलेक्टर ऑफिसला जाऊन मंदिर उघडा आंदोलन करण्याचं ठरवलं. पुजाऱ्याने यासाठी गावच्या सर्व मंडळींना एकत्र जमवून हा निर्णय घेतला.

सकाळी पाच सहा लॉऱ्या भरून लहान थोरांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत पुजाऱ्याच्या पोटाचा प्रश्न आहे, मंदिर उघडा अशा घोषणा देत पाचच्या पाच गाड्या जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाल्या. कलेक्टर ऑफिसच्या बाहेर या गाड्या लागल्या. अख्या गावाचा लवाजमा बघून सगळेच हादरले. अख्ख्या गावाने कलेक्टर ऑफिसला विळखा घातला पुजाऱ्याला सर्वांच्या समोर घेतलं. तोपर्यंत बातमी मीडिया पर्यंत पोहोचली होती. मीडियाच्या गाड्या धडाधड लागल्या, गावकऱ्यांनी एका भल्यामोठ्या सिंहासनावर पुजाऱ्याला बसवलं आणि मोठ-मोठ्याने घोषणा देऊ लागले. एका मीडियाच्या चॅनल एंकरने  गावातल्या एका माणसाला बाजूला घेत प्रश्न केला, “नेमकं कशाबद्दल आंदोलन चालू आहे सांगू शकाल का? ” माणूस गहिवरल्या स्वरात बोलू लागला, ” आमच्या गांव देवीची पूजा करणारी ही पाचवी पिढी. पुर्वी मंदिर चालू होतं, त्यामुळे त्यांना कसलाच त्रास नव्हता. त्यांच्याही आणि आमच्याही घरात सुख शांती होती. पण, हे लॉकडाऊन झाल्यानंतर मंदिरं बंद ठेवली आणि आमचं ही मंदिर बंद ठेवलं मग तेव्हापासून त्यांना हा पोटाचा त्रास सुरू झाला. आणि हा त्रास गांव देवीच्या प्रकोपामुळे झाला असणार लवकरात लवकर हे मंदिराचे दार उघड केलं नाहीत तर जे इतक्या वर्षा त्यात कधी घडलं नाही ते घडेल. आमच्या पुजाऱ्याचं पहिलं पोट कसे गोल मटोल होतं ते आता किती उतरलंय. देवीने आतून पोट सुकवले पुजाऱ्याला आतून सुकवत आणलय. असंच मंदिरं बंद राहिलं तर एक दिवस पुजारी मरणार आणि आमच्या गावाला दोष लागणार.

त्यामुळे आमची मागणी आहे, देऊळ उघडा आमच्या पुजाऱ्याच्या पोटाचा तरी सरकारने विचार करावा. इतक्यात नुकतेच निवडून आलेले खासदार मंदिराचा विषय बोलल्यावर ताबडतोब धावून आले. कलेक्टरही आले ते आल्या बरोबरच पुजाऱ्याच्या पोटात मोठी कळ आली.

पुजारी जोरजोरात ओरडू लागला, गावातल्या मंडळीने देवीचा अंगारा पुजाऱ्याच्या डोक्याला फासला. पण पुजारी काही केल्या थांबेना. मीडिया उलट-सुलट प्रश्नांनी खासदाराला घेरलं, शेवटी खासदाराने मंदिरं येत्या दोन दिवसात उघडी करण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन देऊ असं आश्वासनं दिलं आणि मंदिरं उघडं झालंच असं समजा एवढं बोलल्या बोलल्या पुजाऱ्याच्या पोटातलं थांबलं. पुजाऱ्याच्या पोटातलं अचानक कसं काय थांबलं हे मात्र एवढ्या गर्दीत कोणाच्याच लक्षात आलं नाही.

सर्व ग्रामस्थांनी आणि पुजाऱ्याने खासदाराचे आभार मानले. पुजाऱ्याने पुढच्यावेळी आमच्या गावात इकडे तिकडे मतं न जाता तुमच्याच पेटीत पडणार असं आश्वासन दिलं. त्या आश्वासनाने खासदार अजून प्रफुल्लित झाला आणि या दोन दिवसातच मंदिर चालू होईल असे आश्वासन दिलं. गाड्या जशा गेल्या तशाच गावात विजयघोषणा देत आल्या. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि स्मितहास्य होतं. तीन दिवसानंतर खासदार स्वतः गावात आला आणि सांगितलं सरकारने आपलं साकडं ऐकलं पुजार्‍याच्या पोटाची समस्या दूर होईल आणि मंदिराचं दार खुलं केलं. आता पूर्वीसारखं चालू झालं. भाविकांच्या मंदिरासमोर रांगाच रांगा लागु लागल्या नवस बोलणारे नवस, नवस फेडणारे, भेटी देणारे अगदी पर्यटकांपासून रांगाच रांगा लागल्या. पुजाऱ्याच्या पोटात दुखायचं थांबलं. पुजाऱ्याचं सुटलेलं पोट वाढायला लागलं, आणि गांवकरी पुजाराचे पोट बरं होत आहे हे पाहून आनंदी झाले. गांवदेवी प्रसन्न झाली गावात पुजाऱ्याच्या घरात वैभव नांदू लागलं. रस्त्याने जाताना वाटेत मराठी शाळा लागते तिथे पावसाने मोठमोठी झाडे वाढलेली, वारूळ उभी राहिलेली शाळेची अवस्था खूपच दयनीय झालेली पण शाळा बंदीमुळे गावात कोणाच्याच पोटात दुखे ना. पुजारी मात्र या रस्त्याने जाताना पडगळीसं आलेल्या शाळेकडे पाहून आपलं पोट मात्र नक्की खाजवत जात असे.

Check Also

एका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा

गावात मोठी कंपनी आली होती, ठरल्याप्रमाणे स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. स्थानिकांना प्राधान्य देण्यात आलं खरं पण शिक्षण …

One comment

  1. Deshach future pan pujaryachya haati ahe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *