Breaking News

झोळीवाला फकीर बाबा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची कल्पनाधारीत वास्तववादी कथा

भारतगाव तसं नुकतंच भरभराटीसाठी डोकं वर काढत  होतं. गावातल्या पोरांना आता आता कुठे शाळेत जायला वाहन मिळतं होतं. शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना कुठे कुठे आत्ता नोकऱ्या लागल्या होत्या, थोडक्यात नुसत्या बुकण्यात खाणाऱ्या लोकांकडे चांगला ओल्या सुक्या खोबऱ्याचा मसाला बनवून जेवण साधारण चमचमीत बनवून खाण्याचे चांगले दिवस आले. पन्नास टक्के घरात टीव्ही आल्या लोकांचे टीव्ही येण्यापूर्वी जेवणाचा आठ वाजताच टायमिंग आता दहा झाला सगळं काही अगदी मस्त चाललेलं होतं. गावांत आता लोकांना नवा विचार करायला संधी मिळाळी नेहमीच्या भाकरीपेक्षा डोक्यात शांत विचार पेरणारा माणूस पाहिजे होता. ज्याच्या भक्तीत विलीन होऊन प्रगतीचा उच्चकोटीचा परमानंद प्राप्त करायचा होता. गावातील असे दोन तीन भक्त मंडळींनी आपल्याला राजकीयदृष्ट्या वर्चस्व स्थापन करायचं असेल, लोकांना भक्ती सत्संगात अडकवलं पाहिजे ज्याने आपला हेतू साध्य होईल. तसं भारत गाव आता ईत्तर गावापेक्षा जरा हुशार आणि आर्थिकदृष्टया सक्षम होतं जाणार गाव म्हणून पंचक्रोशीत कळीत झालं होतं. झालं गावाच्या मिटिंग झालेल्या मिटिंग मध्ये फकीर बाबा गुजरातवाला याला गावात आणायचं ठरलं. गावातील काही तरुण मुलांनी हा बाबा फ्रॉड आहे हे सांगितलं. पण गावकरी म्हणाले तुम्हाला गावची प्रगती दिसत नाही. ताटात खाऊन ताटात हागायची सवय आहे तुम्हाला, गावच्या विकासात सहभागी व्हा. पोरांनी पण तयारी दर्शवून याची गंमत बघूच म्हणून प्रोत्साहन दिले. झालं फकीरबाबा गुजरातवाला गांवात यायची तारीख फिक्स झाली गाव कधी यांचं जोरदार आगमन झालं.

गावभर एकच जयघोष फकीरबाबा गुजरातवाला बस्स. फकीरबाबा भारावून गेला, इतर गावापेक्षा गाव आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्टया बऱ्यापैकी पुढारलेला आहे. आपण आपली डाळ शिजवली पाहिजे. फकीर बाबा पंधरा दिवस थांबणार होते. पण एकंदरीत गावाची परिस्थिती बघता ठरवलं पंधरा दिवस वाढवले पाहिजेत आणि ही घोषणा आपल्या पहिल्याच भाषणात फकीरबाबांनी केली. त्याबरोबर गावातले फकीर बाबांचे कालचे आणि नुकतेच झालेले भक्त खूप खूष झाले. फकीरबाबाबाने प्रवचनांनंतर पूर्ण गाव फिरून गावाची पाहणी केली. फकीरबाबा गुजरातवाला रात्रभर झोपला नाही. गावाचा पूर्ण डोलारा त्याच्या डोळ्यात गच्च भरला. अख्या गावाची कुंडली त्याने दुसऱ्या दिवशी काढली. कोणाकडे किती जमीन, कोणाची किती शेती, कोण कुठे कामाला, कोण किती शिक्षण घेतोय, कोण अती सुखी अश्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याने हर एक चुलीमागे कुंडली ओरबाडून काढली.

फकीरबाबा गुजरातवालाने सुपीक शेतजमिनी धार्मिक स्थळासांठी, मठासाठी घेतल्या. लोकांच्या मेंदूत बिंबवलं की या सुपीक शेतजमिनी जर धार्मिकस्थळासाठी दिल्या तर देव आर्थिक उन्नतीची परिसीमा पार करून देईल . सगळ्या गावकऱ्यांनी विश्वास ठेवून चांगल्या चांगल्या जमिनी धार्मिक स्थळ मठ, सत्संगासाठी दिल्या. शिकत असणाऱ्या पोरांना आपल्या भक्तीपरिवारात सेवेसाठी विनामूल्य सेवा म्हणून धंद्याला लावलं. नोकरी करणाऱ्यांना सेवेपोटी लोकांची फळाची अशा न धरता कर्म करीत राहण्याचे मोठे षडयंत्र त्यांच्या मेंदूत रोवून गावाच्या बाहेर जिथे कुठे जगाच्या पाठीवर असतील तिथून बोलावून त्यांच्या नुकत्याच सुरु झालेल्या करियरची ऐसी तैसी केली. गावकरी शेती सोडून पूर्ण भक्तीत विलीन झाले. बायांना कधी नव्हे तो पुरुषांच्या बरोबरीने भक्तीत विलीन होऊन फकीरबाबा गुजरातवाल्याच्या भक्तीत अख्खा गाव थोडक्यात नागडा झाला. फकीर बाबाने जमिनी विकत घेऊन आपल्या  मर्जीतल्या तिसऱ्याच माणसाला दिल्या. गावातल्या मुलांना काम धंदे सुटलेल्या पोरांना कमी पैशाच्या आपल्या मार्जीतल्या कंपनीत हमखास काम मिळवून द्यायचं आश्वासन दिलं. गावातल्या बायांना पुरुषांना दिवसभर प्रभूचे नामस्मरण हाच एकमेव मोक्षप्राप्तीचा मार्ग म्हणून पूर्णपणे मेंदू भिरभिरवून लावला.

गाव जवळ जवळ रसातळाला गेलं तरी. बाहेर च्या जगात काय चाललय असा कोणाच्याच कपाळावर प्रश्न नाही. लोकांचे खायचे वांदे होऊ लागले. पण हे फकीरबाबा गुजरातवालाने केलाय म्हणजे विचार करूनच केलाय म्हणून लोकं अजुन बाबाच्या पायाशी लोटांगण घालत. ठरल्याप्रमाणे गाव गोचीडा सारखा पूर्ण चोथा झाल्यावर बाबा खूष झाला आपल्या भक्तीत उध्वस्त होऊन गेलेला गाव पाहताना डोळ्यात पाणी आलं. बाबाच्या पाठवणीत अख्खा गाव वेशीवर आला बाबाने गावाला उद्देशून एवढेच बोलला. माझ्या लेकरांनो मी फकीर माणूस आहे हा झोलाचं माझं विश्व आणि हे विश्व घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघत आहे, कारण या झोळीतलं विश्व् कधीही न संपणारं आहे. अख्ख्या गावाने मोठं मोठ्याने फकीरबाबा गुजरातवाल्याचा मोठ्याने उदघोष केला. फकीरबाबाला सोडून गाव जेंव्हा उलट पावली निघाला तेंव्हा अपाला भुंडा झालेला गाव झटकन कोणाच्या नजरेत भरला नाही. दिवसामागून जसे दिवस निघू लागले तसं गावच भुंडंपण लोकांना दिसू लागलं. फकीरबाबा गुजरातवाला बाबाची झिंग हळूहळू ओसरू लागली, तसा गावाचा नागडेपणा ओसंडून वाहताना प्रत्येकाला दिसू  लागला. जेंव्हा गावाची झिंग पूर्ण उतरली तेंव्हा मात्र भारत गावाने मान्य केलं की फकीरबाबा गुजरातवाल्यांने गावाच्या बुडाला चुना लावून पसार झाला. गावाचा डोलारा उभा कसा करावा या प्राथमिक प्रश्नात गाव पुन्हां एकदा पडलं ज्यां तरुणांनी बाबाला विरोध केला होता, त्या तरुणांना तोंड दाखवेना कोणी शेवटी त्या तरुणांच्या हातात आता गाव सुधारण्याची सूत्र दिली. आणि पुन्हां स्वतःला बाबा, फकीर, संत, साधू म्हणवणाऱ्यांना गावांत पाऊलसुद्धा ठेऊ द्यायचं नाही असं ठरवून उध्वस्त झालेला भारत गाव पुन्हां एकदा उभं राहायचा प्रयत्न करू लागला.

Check Also

राष्ट्रीय शिक्षण धोरण: उच्च शिक्षण , संशोधन आणि रोजगार संधी बंगरूळू येथील केएल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.एस.मंथा यांचा विशेष लेख

देशातील शालेय आणि उच्च शिक्षण एकाच छत्राखाली आणण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय  शिक्षण धोरण जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *