Breaking News

स्वतंत्र की एकटा ? वपुंच्या कांदबरीवर आधारीत ‘ढाई अक्षर प्रेम के’

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेत्री मुक्ता बर्वेने अभिनयासोबतच नाट्यनिर्मितीद्वारेही छापा काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, कोडमंत्र या नाटकानंतर आता पाचव्या नाट्यनिर्मितीसाठी सज्ज झाली आहे. मुक्ताच्याच दीपस्तंभ तसंच CODE मंत्र या नाटकातून अभिनय करणाऱ्या सुजाता मराठे या नाटकाद्वारे प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. दिनू पेडणेकर या नाटकाचे निर्मिती सूत्रधार आहेत. ९ नोव्हेंबरला मुहूर्त झालेल्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २३ डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या अंबिका+रसिका निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकाचा शुमारंभाचा प्रयोग होत असून हे नाटक प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या ‘तू भ्रमत आहासी वाया’या कादंबरीवर आधारित आहे.

आजकालच्या धावपळीच्या युगात माणसांवरचा तणाव वाढतो आहे. ताणावांचा परिणाम वैयक्तिक नातेसंबंधांवर होताना दिसत आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना एकटेपणा पसंत करणारा माणूस हा स्वतंत्र होतो आहे का एकटा पडतो आहे? हा मानसशास्त्रीय प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक व.पु.काळे यांनी त्यांच्या ‘तू भ्रमत आहासी वाया’ या कादंबरीत या प्रश्नांचा काळाच्या पुढे जाऊन विचार केला आहे. या प्रश्नाचं चिंतन करताना या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माणसाने स्वतःच्या गरजा नेमक्या किती आणि कोणत्या आहेत त्या ओळखणं आणि स्वतःला आणि नातेसंबंधांना जास्तीतजास्त ‘डोळस’ वेळ देणं ही माणसाच्या सुखी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ठरू शकते असा विचार व.पु.काळे मांडतात. आपल्या कडे नसलेल्या गोष्टींच्या मागे धावण्या पेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घेणे यातूनच सुख सापडू शकते. मोठ्या अर्थाने प्रेम आणि त्यापुढे जाऊन भक्ती हे माणसाच्या जीवनाचे साध्य आहे हा या कादंबरीत सहजपणे आलेला विचार अत्यंत खुसखुशीत आणि खुमासदार पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न ‘ढाई अक्षर प्रेम के’ या नाटकात करण्यात आलेला आहे. जीवन विषयक तत्वज्ञान असले तरी छोट्या छोट्या ऊदाहरणांतून आणि मनोरंजक संवादातून हे नाटक आपल्याला विचार करायला लावणारं आहे.

वपुंच्या ‘तू भ्रमत आहासी वाया’या कादंबरीचं नाट्यरुपांतर आणि नाट्य दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. पुण्यात अनेक हौशी व प्रायोगिक नाटकं करणारे दिग्पाल लांजेकर या नाटकाव्दारे व्यावसायिक नाट्यसृष्टीत प्रवेश करत आहेत. CODE मंत्र या नाटकात कर्नल निंबाळकरांची भूमिका करणारे अभिनेता अजय पुरकर ‘ढाई अक्षर प्रेम के’ नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत. रुद्रम मालिकेत छोटीशी भूमिका साकारणारी तरीही लक्षात राहिलेली अभिनेत्री किरण खोजे या नाटकात अजय पुरकर सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ह्या दोघांशिवाय ‘ढाई अक्षर प्रेम के’ मधे सचिन देशपांडे, अतुल महाजन, तेजस कुलकर्णी, नितीश घारे, अश्विनी कुलकर्णी ह्यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं असून, पार्श्वसंगीताची बाजु नुपूरा निफाडकर यांनी सांभाळली  आहे.  वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून प्रकाशयोजना राहुल जोगळेकर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *