Breaking News

मंत्रालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावली “उपहारगृह” ची माणूसकी…! १२ जणांनी एक हजारहून अधिक व्यक्तींच्या जेवणाची केली व्यवस्था

मुंबईः प्रतिनिधी
मुंबईत कालपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा आज बुधवारी भलताच मुंबईकरांना फटका बसला. ऐरवी सकाळी सुरु झालेले मंत्रालय संध्याकाळी रिकामे होते. मात्र या अतिवृष्टीचा परिणाम शहरातील सर्वच वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना मंत्रालयातच थांबण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र या अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपगृहातील कर्मचाऱ्यांच्या माणूसकीने धाव घेत या सर्वांची अल्प दरात रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली.
मंत्रालयातील अनेक कर्मचारी, अधिकारी हे कल्याण, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, विरार, बोरीवली सारख्या लांबच्या ठिकाणी राहतात. मात्र अतिवृष्टीमुळे मुंबईची जीवनवाहीनी असलेली लोकल सेवा बंद पडली. त्यामुळे संध्याकाळी सर्वच चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. त्यातच प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्र मंत्रालयातच काढण्यास परवानगी दिली. एरवी संध्याकाळी ६ नंतर मंत्रालय ओस पडलेले दिसायचे. मात्र आजच्या अतिवृष्टीमुळे मंत्रालयात रात्रीचे १० वाजले तरी गजबज दिसत होती.
पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने मंत्रालयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र रात्रीच्या जेवणाचे काय असा प्रश्न अनेकांना पडला. याची विचारणा होण्यापूर्वीच उपहारगृहाचे महाव्यवस्थापक दादासाहेब खताळ, सहायक व्यवस्थापक मेघनाद सुळे व चंद्रकांत मेंगाळ यांनी दिनानाथ पारधी, तुकाराम चौरे, भरत वाझे, माढा स्वामी सोलापन, प्रकाश शिर्के, यशवंत माळी, बाळाराम गिझे, संजय कळंबकर, प्रविण वडे, विजय शिंदे, जयसिंग सोलंकी, शिवाजी आव्हाड, परशुराम सितप, रामचंद्र सावंत, किरण सांगळे, धोंडू कोकाटे या सर्व कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अतिवृष्टीच्या पावसामुळे घरी जाता येणार नाही म्हणून उपहारगृहाचा आचारी लवकरच निघून गेला होता. तरीही या सर्व कर्मचाऱ्यांनी एक हजारहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे मंत्रालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय झाली. तसेच कर्मचाऱ्यांनीही तृप्त मनाने या व्यवस्थेचा स्विकार केला.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *