Breaking News

प्रशासनात डॉक्टर सहकारी असल्याचा असाही विभागाला फायदा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉ़डी स्टेट करून सुरक्षिततेची घेतली काळजी

मुंबई : विशेष प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. या विषाणूच्या संसर्गाची लागण स्वत:लाही होवू नये यादृष्टीने अनेकजण पुरेशी काळजी घेत आहेत. तरीही या विषाणूची लागण काही जणांना होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी विभागातील सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चक्क अॅण्टीबॉडीची तपासणी करून योग्य ती काळजी घेण्यास प्रवृत्त केले.

राज्याच्या प्रशासकिय कामाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाचे कामकाज ५ टक्क्यावरून १५ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या वाढीव संख्येमुळे साहजिकच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार होती. तसेच अनेक कर्मचारी मुंबई शहर आणि उपनगरात रहात असल्याने प्रवासा दरम्यान किंवा इतर कारणाने या विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त होता. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची थर्मलमीटरने तपासणी करणे, वापराच्या वस्तू सतत सॅनिटायझ करणे आदींची सूचनावलीही तयार करण्यात आली. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल का नाही याची शाश्वती नव्हती. त्यावर डॉ. पुलकंडवार यांनी शक्कल लढविली.

त्यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एचएलएल या आरोग्य चाचणी करणाऱ्या संस्थेला बोलावित या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अॅण्टीबॉडी चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांनी यासाठी पाठपुरावा करत डॉ. पुलकंडवार यांना ही टेस्ट सर्वांसाठी करायला भाग पाडले. त्यानंतर एचएलएल या संस्थेला या विभागात पाचारण करून दोन दिवस या चाचण्या करण्यात आल्या. या दोन दिवसात ५० जणांची जवळपास चाचणी करण्यात आली. यातील अनेकांच्या शरीरामध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अॅण्टीबॉडी तयार झाल्याचे दिसून आल्याची  माहिती उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी दिली.

तर यातील तीन जणांना कोरोनाची लागण होवून या अॅण्टीबॉडीमुळे पूर्णत: बरे झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे तिघे सहकारी हे रूग्णालयात दाखलही झाले नव्हते. तरी ते या आजारातून बरे झाल्याचे आढळून आले. तसेच विभागातील सहकाऱ्यांच्या शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण तपासण्यासाठी ऑक्सीमीटरच्या माध्यमातूनही चाचणी करण्यात आली. यावेळी ज्यांच्या शरीरात ऑक्सीजन कमी आहे त्यांना योग्य तो सल्ला देवून ते वाढविण्यासाठी त्यांना योग्य ते आरोग्यविषयक सल्ले एचएलएलने दिले. या संस्थेने आमच्या चाचण्या करण्यासाठी एक पैसाही आकारला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील प्रत्येक विभागात किंवा मजल्यावर कोणी तरी कोरोना पॉझिटीव्ह झाल्याची माहिती सतत ऐकण्यात येते. त्यामुळे काळजी वाटते. पण प्रत्येक विभागाने त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांची अॅण्टीबॉडी चाचणी केल्यास कर्मचाऱी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सक्षम आहे की नाही हे समजायला मदत होईल. जर कमतरता असेल तर त्यावर वेळीच खबरदारी घेत या विषाणूचा सक्षमपणे सामना करण्यास मदत होईल. इतर विभागांनीही अशा पध्दतीची चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

 

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *