Breaking News

महेश कोठेंच्या पक्षप्रवेशाचे ट्विट पवारांनी डिलीट करण्यामागे कोण ? काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेविषयीचे प्रेम कोठेंच्या आडवे आले

सोलापूर-मुंबई : विशेष प्रतिनिधी

गेले दोन-तीन दिवस सोलापूरातील वजनदार नेते महेश कोठे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याच्या निमित्ताने आणि शरद पवारांनी आधी त्यांना प्रवेश दिला व नंतर त्याविषयीचे ट्विट डिलीट केल्याने कोठे कधी नव्हे ते चर्चेत आले. त्यामुळे पवारांच्या नेमक्या त्या डिलीट मागे कोण आहे ? अशी उत्स्तुकता राज्यात निर्माण झाली आहे.

तर सोलापूर शहराच्या राजकारणात सुरुवातीला माजी केद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वरचष्मा होता. त्यावेळचे त्यांचे विश्वासू सहकारी स्व.विष्णूपंत (तात्या) कोठे हे होते. सोलापूरातील शिंदे यांच्या निवडणूकीपासून पक्षात कोणाला प्रवेश द्यायचे कोणाला नाही यापासून ते महापालिकेत काय निर्णय घ्यायचा आणि नाही, महापालिका निवडणूकीत कोणाला तिकिट द्यायचे इथपासून कोणाला फक्त तिकिट द्यायचे येथेपर्यत सर्वकाही विष्णूपंत कोठेच बघायचे. त्यानुसार स्व. विष्णूपंत कोठे यांचे चिरजींव महेश कोठे हे शहरातील काँग्रेसचे नेते म्हणून हळूहळू उदयाला आले. महापालिकेत गटनेते झाले नंतर महापौर झाले. विष्णूपंत कोठे यांनाही नगरसेवक आणि आमदार व्हायचे होते. मात्र त्यांना होता आले नाही. त्यामुळे त्यांनी मुलाच्या माध्यमातून सर्व गोष्टी करायला सुरुवात केली.

साधारणत: २००० सालानंतर विष्णूपंत कोठे यांनी महेश कोठे यांना आमदार करायचा यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. परंतु माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी नकारघंटा कळविण्यास सुरुवात केली. नंतरच्या कालावधीत तर शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या लोकसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणूकीत त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधु स्व.प्रतापसिंह मोहित-पाटील हे विजयी झाले. या घटनेपासून विष्णूपंत कोठे आणि सुशिलकुमार शिंदे यांच्यातील दुराव्याला सुरुवात झाली.

त्यानंतरही ते एकत्रित कारभार असल्याचे फक्त दाखविले जात असे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यात दुरावा वाढत चालला होता. २००९ च्या निवडणूकीत महेश कोठे यांनी विधानसभेची चांगलीच तयारी केली होती. सुशिलकुमार शिंदे यांनी आपली मुलगी प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर मध्य मधून उमेदवारी मिळवून देत कोठे यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे चिडलेल्या महेश कोठे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत एमआयएमकडून निवडणूक लढविली. त्यामुळे शिंदे आणि कोठे परिवारातील दुरावा आणखीच वाढला.

त्यानंतर २०१९ निवडणूकीत महेश कोठे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढविली. मात्र ते प्रणिती शिंदे यांचा पराभव करू शकले नाहीत. मात्र महापालिकेवरील सत्ता त्यांनी आजही अबादीत ठेवली आहे.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची मैत्री जगजाहीर आहे. तसेच पवारांनी वेळोवेळी शिंदे यांना मदत केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत दस्तुरखुद्द शरद पवार यांनी तीन दिवस सोलापूरात तळ ठोकला होता. याशिवाय स्व.विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून सुशिलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात पवारांचा हात मोठा होता. त्यामुळे जर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महेश कोठे हे आले तर सुशिलकुमार शिंदे यांचे उरले-सुरले राजकिय अस्तित्वही संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने शिंदे यांनीच पवारांना फोन करून राष्ट्रवादीत महेश कोठे यांना न घेण्याची विनंती केली तर नाही ना अशी चर्चा राजकिय वर्तुळाबरोबर सोलापूर शहरात सुरु झाली आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *