Breaking News

केवळ सत्ता टिकविण्यासाठी वर्षभर महाविकास आघाडीची धडपड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने गेले वर्षभर केवळ सत्ता टिकविण्यासाठी धडपड केली. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारमुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस भरडला गेला, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथे केली.

महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षातील अपयशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व भाजपा पुणे प्रभारी गणेश बीडकर उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारमधील घटकांनी सत्ता टिकविण्यासाठी वाट्टेल ते अपमान सहन केले व केवळ खुर्चीसाठी धडपड करून सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. पण कोरोनाचा मुकाबला, शेतकऱ्यांना दिलासा देणे, महिलांचे रक्षण करणे, मराठा आरक्षण वाचविणे अशा सर्वच बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आणि सर्वसामान्य माणूस भरडला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत दिलेल्या धमक्यांविषयी विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण किंवा मुखपत्रातील मुलाखत असो, अशी धमकीची भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच वापरली नाही. ते वारंवार धमक्या देत आहेत, पण आम्ही घाबरत नाही. गेले वर्षभर आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध उत्पादकांचे प्रश्न, वाढीव वीजबिले, मंदिरे उघडणे अशा अनेक मुद्द्यांवर संघर्ष केला आहे. यापुढेही संघर्ष चालू ठेऊ.

त्यांनी सांगितले की, कोरोनाचे देशातील सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य जगातील १७७ देशांपेक्षा पुढे आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजूरांचे हाल झाले. कोरोनाच्या संदर्भात फार मोठा भ्रष्टाचार झाला. आगामी विधिमंडळ अधिवेशनात हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा इशाराही दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा महाविकास आघाडी सरकारने सत्यानाश केला. त्यांना हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविता आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही मराठा समाजाला आधी दिलेले प्रवेश आणि नोकऱ्यांच्या बाबतीत प्रयत्न करून आरक्षणाचा लाभ मिळवून देता आला असता पण या सरकारने तेही केले नाही. मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी स्पष्ट तरतूद कायद्यातच केली आहे तरीही सत्तेतील नेते ओबीसी समाजाला अस्वस्थ करत आहेत. यामुळे काहीजणांचा राजकीय स्वार्थ साधला जाईल पण यामुळे तेढ निर्माण होऊन सामाजिक वीण विस्कटण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा भाजपा आणि काँग्रेसवर निशाणा

आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींविषयी त्यांनी केलेले द्वेषपूर्ण भाषण आणि जातीय आधारावर मतदान करण्याचे आवाहन त्यांच्या जिंकण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *