Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, सुप्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारीका यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी वरील मागणी केली.

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आमचे नेते आदरणीय शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सातत्याने केलेली आहे.यावेळी या प्रस्तावावर बोलताना सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली.  त्याचा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी फुले दाम्पत्यांना हा पुरस्कार द्यावा अशी मागणी करताना यासाठी आम्ही अनेकवेळा मागणी केली, त्यासाठी सातत्याने भांडत आहोत.  परंतू भारतरत्न मिळण्यात क्रांतीसुर्य कमी पडत आहेत की आमचे प्रयत्न कमी पडत आहेत असा प्रश्न उपस्थित केला.

राष्ट्रपती होईपर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असणारे प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर मात्र मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असे कधीही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी कायम शिष्टाचार पाळला. या देशातील काही राज्यपालांना मात्र याचा विसर पडतो आहे आणि ते उघडपणे मी पक्षाचा एखाद्या संघटनेच्या विचारसरणीचा कार्यकर्ता असल्याचे जाहीररित्या बोलत असल्याचा चिमटा त्यांनी काढला. नागपूरमध्ये संघ कार्यक्रमात जाऊन त्यांनी सांगितलेल्या पाच मोलाच्या गोष्टीही त्यांनी वाचून दाखविल्या तसेच त्यांचा गौरव म्हणजे काँग्रेसचा विचारांचा नरेंद्र मोदी सरकारने केलेला गौरव आहे असा उल्लेख केला.

आरएसएसचे स्वयंसेवक असूनही नानाजी देशमुख हे पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचारांचे होते याकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले तर भूपेन हजारीका हे शब्दांचे सौंदर्य आपल्या गाण्यातून मांडणारे महान व्यक्तीमत्व होते.  त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार हा त्यांचा सांगितीक कारकिर्दीचा गौरव असल्याचे उदगार काढले.

या तीनही भारतरत्नांनी केलेले कार्य, दिलेले विचार खुप महान आहेत. त्यांचे विचार त्यांनी सुरु केलेल्या सामाजिक कार्यातून यापुढेही सुरु राहील असा विश्वास मुंडे यांनी बोलतांना व्यक्त केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *