Breaking News

राज्यातल्या कोणत्या भागातून किती कर मिळतोय माहितेय? मराठवाडा आणि विदर्भातून एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्यातील ग्रीन झोनमधील जिल्हे वगळता रेड झोनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची कालावधीही वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याबरोबरच नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले असून यापूर्वी कोणत्या महसूली विभागातून किती उत्पन्न राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत होते याची आकडेवारी पाहू या.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून उद्योग नगरी म्हणूनही ओळखले जाते. या भागात अर्थात मुंबई महानगरात रोजगाऱ्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तरूणांबरोबरच इतर राज्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर मुंबई महानगरात रोजगाराच्या निमित्ताने येतात. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, सातारा आदी भागात कारखानदारीबरोबरच सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, दूध डेअरी, पशुसंवर्धनाचे आणि त्याशी संलग्न उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
जीएसटी विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर आणि पश्चिम महाराष्ट्रातून एकूण जीएसटी उत्पन्नाच्या ६० टक्के वाटा या भागातून जमा होतो. साधारणत: वर्षाकाठी फक्त जीएसटी करापोटी १ लाख ५० हजार कोटींपैकी ८० ते ९५ हजार कोटी रूपये या भागातून सरकारला मिळतात.
मराठवाड्यात सर्वाधिक कारखाने औरंगाबाद आणि शेंद्रा-बिडकीन एमआयडीसी येथे असून त्यानंतर या भागातील इतर जिल्ह्यात संख्येने थोडी कारखानदारी आहे. मोठ्या उद्योगाचे प्रमाण फारसे नाही.
त्यानंतर विदर्भातील नागपूर महानगरात समावेश असलेल्या मिहान प्रकल्प आणि इतर काही प्रकल्प आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरात फारसे उद्योग आणि सहकार तत्वावरील प्रकल्प नाहीत. मात्र या भागाला तीन राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातून ४० टक्के कर रूपाने निधी राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होतो. इतर अबकारी कर, सेवा कर, मुद्रांक शुल्क, राज्य वस्तु सेवा व कर, वाहनावरील कर, जमीन महसूल आदी सर्व कर हे मुंबई महानगर आणि पश्चिम महाराष्ट्रातूनच सर्वाधिक जास्त जमा होत असल्याची माहिती जीएसटी विभागाने दिली.
त्यामुळे मुंबई महानगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार नाही. तोपर्यत या भागातील रोजगाराच्या संधी आणि राज्याच्या तिजोरीत जाणारा कर पुन्हा सुरू होणार नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनीच कोरोनाच्या मर्जीनुसार चालायचे कि कोरोनावर हद्दपार करायचे याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

Check Also

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तृतीयपंथी उमेदवारांकरिता नियम निश्चित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *