Breaking News

महाराष्ट्रातही बलात्कार, लैगिंक छळ आदींच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नवा कायदा मांडणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असून या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.

विधान परिषद सदस्य हेमंत टकले तर विधानसभेत सुनिल प्रभू यांनी वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याच्या अनुषंगाने महिला सुरक्षेसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना ते  बोलत होते.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशात ‘दिशा’ कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याच्या धर्तीवर आवश्यक त्या सुधारणा करून महाराष्ट्रातही अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कायद्याचा अभ्यास व त्याअनुषंगाने राज्यात अंमलबजावणीसाठी पाच पोलिस अधिका-यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. या अहवालानंतर या कायद्यासंदर्भातील विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी शासन गंभीर असून, हा नवीन कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या महिला सदस्या तसेच महिलांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था यांच्या सुचनाही विचारात घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या तीन महिन्यात राज्यभरातील 1150 पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी सहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना मनोधैर्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. येत्या काळात ज्वलनशील पदार्थांमुळे बळी पडलेल्यांना मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला अत्याचार प्रतिबंध आणि समुपदेशनासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या यशस्वीतेनंतर राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तक्रारींच्या नोंदणीसाठी सीसीटीएनएस या प्रणालीद्वारे ऑनलाईन तक्रारींची सुविधा उपलब्ध करून  देण्यात आली असल्याचेही त्यांनी विधान परिषदेत सांगितले.

मुंबईत सध्या पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असून आणखी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त माध्यम ठरणार आहेत. राज्यातील नवीन तसेच जुन्या इमारतीत सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री  कपिल पाटील, गिरीश व्यास, नागो गाणार, प्रकाश गजभिये, हुस्नबानो खलिफे, निरंजन डावखरे, जोगेंद्र कवाडे, किशोर दराडे, रामदास आंबटकर, परिणय फुके, प्रसाद लाड, भाई गिरकर, अंबादास दानवे, श्रीमती ॲड. मनिषा कायंदे, विद्या चव्हाण यांनी तर विधानसभेत सदस्य सर्वश्री अबू आझमी, प्रणिती शिंदे, यामिनी जाधव, सुलभा घोडके यांनी सहभाग घेतला.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *