Breaking News

अर्थसंकल्पात फक्त आश्वासनांचे बुडबुडे अजित पवार यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असे वाटले होते. मात्र सरकारने कोणत्याच घटकाला योग्य निधी ना न्याय दिल्याचा आरोप करत आरोग्य खात्याला निधीची कमतरता भासत आहे. सोय सुविधा नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सर्वच खात्याची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थसंकल्प निराशाजनक असून फक्त आश्वासनांचे बुडबुडे दिसून येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधान सभेत केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते.

कर्नाटक राज्याने स्वतंत्र कृषी बजेट सादर केले तसे आपल्या राज्यातही होईल असे वाटत होते. मात्र तसं झालं नाही. स्वतंत्र बजेट मांडले असते तर कृषी खात्याचा फायदा झाला असता. अर्थमंत्री म्हणतात राज्य योग्य दिशेने चालले आहे. पण राज्यावर ५ लाख कोटींचे कर्ज होणार असून त्यास राज्य सरकारचे निर्णयच जबाबदार राहणार आहे. सगळी सोंगं करता येतात पैसेचे सोंग करता येत नाही. केंद्रात राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे मात्र राज्याला हवा तसा निधी मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्याच्या इतिहासात सर्वाधिक वित्तीय तुट या बजेटमध्ये दिसली. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. शेतकरी समाधानी असते तर शेतकऱ्यांनी ऐवढे मोठे आंदोलन केले असते का ? सरकारच्या नियोजनशुन्यतेचे हे उदाहरण आहे. महाराष्ट्राला, मुंबईला अधिकचा निधी कसा मिळेल याचा प्रयत्न आम्ही करू असे सुधीर मुंगटीवार यांनी जीएसटी बिल पास करताना बोलले होते. मात्र मुंगटीवार यांनी फक्त शेरो शायरीवर भर दिला. मात्र जे चार वर्षे केलेच तेच याही वर्षी केले. बजेटमध्ये नवीन काहीच नव्हते. सांगा कोणता शेतकरी आज समाधानी आहे ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

साखरेचे भाव पडले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही परवडले पाहिजे तीच परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. सरकारने शेतकऱ्यांना बजेटच्या माध्यमातून अनुदान द्यायला हवे होते. सिंचन क्षेत्राचा निधी वाढवला गेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याअंतर्गत सिंचन विभाग येतो ते म्हणाले की, सिंचनासाठी निधी कमी पडू देणार नाही. सरकारने केंद्राकडे मागणी करावी. गडकरी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे अशी सूचनाही अजित पवार यांनी केली.

७ व्या वेतनबाबत सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. आज आंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी नाराज आहेत. बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांना, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. बेरोजगारी वाढली आहे. नव्या भर्त्याही सरकारने बंद केल्या आहे. सरकार रोजगार कसा निर्माण करणार आहे? त्याबाबत बजेटमध्ये स्पष्टता नाही. सरकारने फक्त मुंगेरीलाल के हँसी सपने दाखवले आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आजही आझाद मैदानात आंदोलन करत आहे. सरकारने त्याला दिलासा द्यायला हवा अशी मागणीही केली.

हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. मोठे उद्योगपती ज्यावेळी पैसे बुडवून पळून जातात तेव्हा सरकार फक्त बघ्याची भूमिका घेते. पण शेतकऱ्यांना मदत करत नाही. सरकारने ते पैसे वापस घ्यावेत जर त्या पैशांमध्ये काही चुकीचे असेल तर त्यावर कारवाई करा मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करू नका अशी इशाराही त्यांनी दिला.

सरकारचा कारभार म्हणजे बेशिस्तपणाचे उत्तम उदाहरण. सामाजिक न्याय, आदिवासी विभाग यावरही सरकारने अन्याय केला आहे. हवा तसा निधी सरकारने दिला नाही. याचे उत्तर सभाग्रुहाला द्या

मुंबईला ठेंगा दाखवण्याचे काम सरकारने केले. सरकार म्हणतंय २०२२ पर्यंत सर्वांना घरे देऊ. तुमची मुदत २०१९ पर्यंत मग घरे २०२२ ला कसे देणार ? असा उपरोधिक सवाल करत समाज कल्याण विभागाचे १२ हजार ५०७ कोटीचा निधी पडून आहे, आदिवासी विभागाचे १५ हजार कोटी निधी पडून आहे. सरकार हा निधी का खर्च करत नाही ? सरकार फक्त घोषणा करते हेच या सरकारचे धोरण असल्याची टीका त्यांनी शेवटी केली.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *