Breaking News

‘पोक्रा’ अंतर्गत गावांची माहिती आता एका क्लिकवर! कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाईन ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी आदी अधिकारी उपस्थित होते.

“ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेमुळे पोक्रा अंतर्गत प्रत्येक गावाची माहिती  शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. यामुळे या प्रकल्पाअंतर्गत योजनांना अधिक चालना व हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन मिळेल ” असे त्यांनी सांगितले.

पोक्रा अंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती या ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेत देण्यात आली आहे. महा पोक्रा संकेतस्थळावर खास एक विभाग विकसित करण्यात आला आहे. जिल्हा, तालुका व त्यातील गाव निवडून गावाची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे. https://mahapocra.gov.in/village-profile या लिंकवर जाऊन कोणीही कोणत्याही गावाची माहिती पाहू शकतात.

हवामानात होणारे बदल शेती, शेतीपुरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेकदा आपल्या भागातील शेती योजनांची माहिती शेतकऱ्यांना एका ठिकाणी उपलब्ध नव्हती, ती आता सहज उपलब्ध होत आहे.

पोक्रा अंतर्गत १५ जिल्ह्यांतील प्रत्येक प्रकल्प गावातील पोक्राचे समूह सहायक, कृषीसहायक, शेतीशाळा प्रशिक्षक, संबंधित तालुका व उपविभागीय कृषी अधिकारी असे प्रकल्प कर्मचारी व अधिकारी, तसेच सरपंच व ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी यांची संपर्क सूची देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी संबंधितांशी थेट संपर्क साधू शकतात. तसेच, गावातील शेतकऱ्यांनी घेतलेला वैयक्तिक लाभ व घटकनिहाय अनुदान वितरण, एकूण नोंदणी व अर्ज संख्या कळेल. ग्राम कृषी संजीवनी समितीच्या पुढाकाराने गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे, गावातील पाण्याचा ताळेबंद,  पिकाखालील एकूण क्षेत्र याचा तपशील असा एकूण गावाचा लेखाजोखा येथे मांडण्यात आला आहे. गावाचा नकाशा देखील यामध्ये पहायला मिळेल. यामुळे अत्यंत पारदर्शकपणे सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

सन २०११ ची जनगणना, २०१० ची कृषी गणना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी तथा पोक्रा प्रकल्पाचा डेटाबेस यांच्या आधारे ही ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेच्या मार्गदर्शक सूचना व लाभासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक या दर्शिकेत उपलब्ध होतील, असे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *