Breaking News

महाभारतात दुर्लक्षित राहीलेला “युयुस्तु” संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे विश्लेषण

महाभारत! भारतातील एक महत्वाचे महाकाव्य, सत्य की असत्य? रचलेले की घडलेले? माहीत नाही. पुराव्यावरून कदाचित होय घडलेले पण वास्तववादी विचार केला तर रचलेले. महाभारता बद्दल अनेक शंका कुशंका अनेकांच्या मनात आहेत. नाटकाच्या संदर्भात त्यातील व्यक्तिरेखांचे अनेक पैलू आपल्या पुढे येतात. महाभारतातील ‘व्यासाला’ आपण जर वसंत कानेटकर लिखित ‘ संगीत मस्त्यगंधा’ मध्ये बघितलं तर त्याचा एक पुरुष म्हणून आदर आणि अभिमान वाटावा लेखकाने व्यासाला रेखाटले किंवा व्यास त्यांच्या अर्थी तसाच आहे. पण धर्मवीर भारती यांच्या ‘अंधायुग’ मधे व्यासाला बघितले तर तेवढाच राग आणि क्लेष निर्माण व्हावा ही शक्यता आहे.
महाभारतात पांडव शूर वीर आणि सत्याची बाजूचे प्रतिक म्हणून आपल्या पुढे उभे राहतात त्याचं कारणही तसंच आहे. महाभारतचे नायक पांडव तर खलनायक कौरव, पांडवाकडे सहानूभूतीने तर कौरवांकडे तिरस्कारने पाहिलं जात. महाभारत पांडवांच्या विजयाची कहानी मंडली पण धर्मवीर भारतीने कौरवाच्या पराभवाची करुण कहानी रेखाटली अंधायुग बघताना किंवा वाचताना कौरवांची दीन दैनाची दाहकता दिसून येते. यातील एक व्यक्तिचारित्र मात्र महाभारतातून अचानक दुश्मन, खलनायक अथवा घर का भेदी म्हणून त्याला नकळत नाकारतो तो ‘युयुस्तु’! त्याच्या शोकांतिकेला धर्मवीर भारतीने अत्यंत सुंदर रेखाटलं.
युयुस्तू कौरवांचा शेवटचा भाऊ, शूर, उत्कृष्ट लढवय्या. तो कौरव असून सुद्धा त्याला कौरवाची बाजू चुकीची वाटत होती, म्हणून त्याने पांडवाकडून (तथाकथित सत्याकडून) युद्धामध्ये सहभाग घेतला. पुढे सख्ख्या भावांना त्याने त्यांची चूक माफ न करता मारायला मागेपुढे पाहिले नाही, तेव्हा मात्र त्याच्या मनात काय काहुर उठले असेल त्याचा आपण विचारही करू शकत नाही. पांडव युद्ध जिंकले, विजय उत्सव साजरा होवू लागला. ‘आपण सत्याच्या बाजूने लढलो, सत्याच्या विजयामध्ये आपला पण वाटा आहे’ या भावनेने तो खुषही झाला आणि ‘आपणच आपल्या एका आईच्या पोटच्या भावाना मारून टाकले’ याची दाहकताही त्याच्या हृदयात असेलच! कदाचित ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन खरं तर पांडवाने त्याचे आभार मानयला हवे. फक्त आभारच नाही तर त्याचा सन्मान करायला हवा पण पांडवाचे जे कृत्य होते, त्याने तो तारतार झाला. पांडवाने विजय उत्सवात युयुस्तू ला भर सभेतून ‘तू एक कौरव आहेस!’, ‘तुझ्याही अंगात कौरवांचच रक्त आहे!’ म्हणून त्याला आपल्या नगरीतून हाकलून दिले, त्या लढवय्याचा अपमान केला.
युयुस्तू परत आपल्या घरी म्हणजेच कौरव नगरीत परतला. येथे फक्त रडण्याचा आक्रोश, किंकाळया! जिकडे बघितलं तिकडे चिता जळत आहेत, पाच वर्षाचं पोर आपल्या बापाची चिता जाळत आहे, आई आपल्या तरुण मुलाची चिता जाळत आहे, नववधू जिच्या अंगावरची अजून हळदही पूर्णपणे उतरली नाही, ती आपल्या पतीची चिता जाळत आहे. जे सैनिक जिवंत उरले त्यांचे युद्धात हात गेले, कोणाचे पाय, डोळे गेले, ते का जिवंत राहिले? असा प्रश्न पडावा अश्या अवस्थेत उरले. युयुस्तुला बघताच ते किंचळू लागले त्यांच्या अक्रोशाचा टाहो झाला शिव्या शाप देऊ लागले. आपण येथे न थांबता दुसरीकडे कुठे तरी निघुन जावं असा विचार त्याच्या मनात आला तोच विदुरच्या तो नजरेस पडला. विदुरने युयुस्तू ला समजावाले ‘हा अपमान सहन कर आणि राज महालात चल, बघ राजमहाल किती ओस पडला आहे.’ त्यावर युयुस्तुला आई बाबा काय म्हणतील म्हणून थबकला. त्यावर विदुर म्हणाला ‘पोरकी झालेल्या आईला आपला एकमेव जिवंत राहिलेला पोरगा बघुन बरं वाटेल.’ युयुस्तू ला हायस झालं आणि तो विदुर सोबत आई गांधारी कडे गेला. आईने आपल्या भावना आणि अपतांचा खुनी म्हणून त्याला निघुन जायला सांगितले. सत्याची बाजू म्हणून पांडवाच्या विजयाचा शिलेदार बनला मोबादला म्हणून त्याला तेथून अपमानित करुन हाकलुन देण्यात आले, भावांचा खुनी आपतांचा खूनी म्हणून त्यांच्याच घरात, नगरात येण्यास मज्जाव केला. युयुस्तू हा दोन्ही बाजूंचा अपमान सहन करू शकला नाही. तो हतबल झाला नैराश्यात गेला आणि शेवटी त्याने स्वतःला संपवले. श्रीकृष्णने अर्जुनाला गीता सांगितली, विरोधी पक्षात आपलेच भाऊ म्हणून त्याने शास्त्र टाकले तेव्हा आपणाला त्याची दया येते, त्याच्या मानवतेचा साक्षात्कार होतो. त्यामुळेच की काय आपला युयुस्तूच्या शोकांतिकेवर आपलं लक्ष जात नाही किंवा तो कौरव आहे म्हणून मुद्दामहुन ती दाबली असावी.
नाटक करत असताना बऱ्याच वेळा अभिनेता व्यक्तिरेखा रेखाटतो, कधी कधी त्या व्यक्तिरेखेला आपल्या जीवनाशी संबंध जोडू पाहतो. अशीच एक व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला दिग्दर्शकाने हट्टाने माझ्यावर सोपवली. हट्टाने ह्यासाठी की अंधायुग हे योध्द्याचं नाटक मी कोणत्याच व्यक्तिरेखेसाठी साजेसा नव्हतो हे मला माहीत होत, म्हणून मी मिलिंद इनामदाराना दिग्दर्शनात मदत करायला मागत होतो, पण मिलिंद इनामदार युयुस्तू ही व्यक्तिरेखा जर मी केली तरच नाटक करेन नाही तर नाही. माझ्या सगळ्या मित्रांनी मला ती भूमिका करण्यासाठी पटवलं मी ही तयार झालो. कारण अॅकडमीच आमचं हे शेवटच वर्ष आणि शेवटच नाटक आणि तरीही नविन नाट्यप्रकार शिकायला मिळातय म्हणून मग मी ही तयार झालो. आणि त्या निमित्ताने मला युयुस्तूची शोकांतिका कळली त्याबद्दल अॅकडमी ऑफ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ आणि मिलिंद इनामदार ह्यांचे धन्यवाद!

– अंकुर विठ्ठलराव वाढवे

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *