Breaking News

हत्तीरोगाचे २०२१ पर्यंत उच्चाटन करा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी

हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २ मार्च ते २० मार्च २०२० पर्यंत  नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, या ६ जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या माध्यमातून अंतरविभागीय समन्वय पर्यवेक्षण व जनजागृती वर भर द्यावा. सर्व पात्र व्यक्तींना हत्तीरोग गोळ्यांच्या सेवनाची खात्री करुन आपला जिल्हा २०२१ पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करावे असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहिम २०२० चे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या हत्तीरोग मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेता स्वप्नील जोशी आहेत.

यावेळी हत्तीरोग यावर आधारीत चित्रफित सुरवातीला दाखवण्यात आली. आरोग्यमंत्री टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातील हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम कशा प्रकारे राबविण्यात येतो त्यांच्या अंमलबजावणी व पूर्वतयारीविषयी माहिती जाणून घेतली.

गुणवत्ता वाढवण्यासाठी गृहभेटी शिवाय शाळा, कॉलेज कार्यालय, कारखाने व गरजेनुसार बुथ मार्फत नागरिकांनी गोळ्या सेवन कराव्यात यासाठी सेवनावर सुक्ष्मकृती नियोजनमाप्रमाणे कार्यवाही व्हावी. सध्या राज्यातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, ठाणे व पालघर या आठ जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांनी १०० टक्के गोळ्या सेवन केल्या जातील याची खात्री करावी. किरकोळ दुष्परीणाम आढळल्यास त्याचे त्वरीत उपचार करण्यासाठी त्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देत चालु वर्षी नागपूरसह, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये आयव्हरमेक्टीन, डीईसी व अल्बेंडॅझोल या ट्रिपल ड्रग थेरपीनुसार मोहिम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड, गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये डिईसी व अल्बेंडॅझोल हत्तीरोग विरोधी गोळ्याचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी व्यक्ती वगळून सर्व व्यक्तीना मोहिमेअंतर्गत गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. मागील वर्षांपर्यंत या मोहिमेमध्ये डीईसी व अल्बेंडॅझोल या दोन गोळ्यांचा समावेश होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयव्हरमेक्टीन या अत्यंत प्रभावी औषधाचा अंर्तभाव प्रायोगीक तत्वावर नागपूर जिल्ह्यात केला. या तिन गोळ्यांचे सेवन सलग दोन वर्षे सर्व पात्र लाभार्थ्यांने केले तर हे जिल्हेही हत्तीरोगमुक्त होऊ शकत असल्याचे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. राज्यात एकूण १८ जिल्हे हत्तीरोग प्रवण होते. त्यापैकी १० जिल्हे हत्तीरोगमुक्त करण्यात आले आहेत. त्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी  आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार,  आरोग्य संचालक पुणे डॉ. अर्चना पाटील आरोग्य संचालक मुंबई डॉ. साधना तायडे, अतिरीक्त संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपसंचालक परीमंडळ, सहायक संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, हत्तीरोग अधिकारी, तालुका अधिकारी, गोळ्या खाऊ घालणारे कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, लाभार्थी, जागतिक आरोग्य संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *