Breaking News

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री खोटे बोलतायत कर्जमाफीची यादी सभागृहात सादर करण्याचे जयंत पाटील यांचे आव्हान

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील कर्जमाफीचा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नसून कर्जमाफीचा अर्ज भरणाऱ्या रमेश कटपला बँकेत खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला. मेसेज आल्यानंतर चौकशी केली तर पैसे आलेले नसल्याचे उत्तर बँकेकडून सांगण्यात आले. असेच नाव युवराज पाटील आणि त्यांच्या मुलाचं असून ही दोन्ही नाव मुख्यमंत्र्यांनी घेतले. या दोघांकडेही कर्जमाफी झाल्याचे प्रमामपत्र आहेत. मात्र त्यांना त्याचे पैसे मिळाले नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खोटी माहीती दिली असून ज्यांना कर्जमाफी जाहीर केली त्यांची यादी सभागृहात सादर करा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत दिले.

विरोधकांकडून विधानसभेत मांडण्यात आलेल्या २९३ अन्वयेच्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेतील चुकीच्या कार्यपध्दतीवर कोरडे ओढत त्यावर टीका केली.

गेल्या तीन वर्षांपासून विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात येत होती. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येची परिस्थिती टोकाला गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनात नसताना कर्जमाफी जाहीर केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चात वाढ झाली असून त्याची आधारभूत किंमतही परवडत नाही. शेतकर्‍यांना बाजारभाव मिळत नाही ही शोकांतिका असून शेतकरी बेजार झालेला आहे. चांगलं पीक आलं तरी भाव पडलेले असल्याने हा व्यवस्थेचा दोष आहे. सावकारापेक्षा शेतकरी बँकेच्या दारात उभा असून कर्ज कमी केलं तरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भार कमी होणार आहे. त्यामुळे बोंडअळीग्रस्त आणि तुडतुड्याने बाधीत शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्याआधी २५ हजार रूपये प्रति एकरी मदत जाहीर करावी अशी मागणी करत बियाणांच्या कंपन्या भाव द्यायला तयार होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल याची शाश्वती द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आदीवासी मंत्री विष्णू सवरांच्या मतदारसंघात विकास निधी खर्च होत नाहीत. त्याचबरोबर ठाण्यातील अनेक तालुक्यांमध्ये ७० टक्क्यांपर्यत निधी खर्चच केला जात नसल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. आदिवासी विभाग, समाज कल्याण विभागाचे पैसे वळवण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात फक्त दोनच विनोदी कार्यक्रम सध्या सुरु असून त्यातील एक चला हवा येऊ द्या आणि दुसरा म्हणजे मातोश्री प्रोडक्शनचा चला सत्ता सोडूया असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *