Breaking News

देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी

विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली.

तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. येथील विज्ञान भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मागील वेळी लोकसभेसाठी ९ टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. तर यंदा त्यात २ टप्प्याची घट करण्यात आली आहे. सात टप्प्यात ५४३ जागांसाठी ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२, १९ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २३ मे रोजी सर्व जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान हे सात मतदारसंघांसाठी ११ एप्रिलला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील एकूण १० मतदारसंघासाठीचे मतदान १८ एप्रिलला होईल. तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे २३ एप्रिलला होणार असून या टप्प्यात १४ मतदारसंघांचे भवितव्य निश्चित होईल. तर २९ एप्रिलच्या अखेरच्या आणि चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात २० राज्यांमधील ९१ जागांवर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ९७ जागांसाठी मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यातील ११५ जागांसाठी मतदान होईल. चौथ्या टप्प्यात ९ राज्यातील ७ जागा, ५ व्या टप्प्यात ७ राज्यातील ५१ जागा, सहाव्या टप्प्यात ७ राज्यातील ५९ जागा आणि ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यात ८ राज्यातील ५९ जागांसाठी मतदान होईल. दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजे १२ मे रोजी मतदान होईल. १२ राज्यातील ३४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही लोकसभेबरोबर मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनची सुविधा असेल. त्यामुळे मतदाराला त्याने केलेले मत कोणाला गेले आहे ते समजेल. त्याचबरोबर ईव्हीएमलाही अनेक स्तरीय सुरक्षा असेल. प्रत्येक उमेदवाराला फॉर्म २६ भरावे लागेल. देशभरात एकूण १० लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. २०१४ मध्ये ही संख्या ९ लाखांच्या आसपास होती. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण देशभरात १८ ते १९ वयोगटातील १ कोटी ५० लाख नव मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तर ९० कोटी एकूण स्त्री-पुरूष मतदार आपला मतदारानाचा हक्क बजाविणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आणखी ७ कोटी नव्या मतदारांची संख्या वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणूकीतील राजकिय पक्षांच्या प्रचारावर आयोगाचे लक्ष राहणार आहे. यावेळी पहिल्यांदाच टी.व्ही, वर्तमानपत्रांबरोबरच सोशल मिडीयावरील फेसबुक, ट्वीटर, गुगल+, युट्युबवरील सर्व जाहीरातींवरही लक्ष ठेवण्यात येणार असून यासर्वांवरील जाहीराती या निवडणूक आयोगाकडून मंजूर केलेल्या असाव्यात असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *