Breaking News

२९ एप्रिलला मुंबई महानगरात आणि नंदूरबार मध्ये मतदान मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

१७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.  महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

अश्वनी कुमार यांनी सांगितले की, निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघासाठी एकूण ४ टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या ७ जागांसाठी ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.  बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर  या १० जागांसाठी १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १४ जागांसाठी २३ एप्रिल २०१९ रोजी  मतदान होणार आहे. नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण-मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या १७ ठिकाणी २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.  मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार आहे.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघात ३ टप्प्यात मतदान झाले होते.

अश्वनी कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ बाबतची दिलेली माहिती पुढीलप्रमाणे

 आदर्श आचारसंहिता

 संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा, शासकीय सार्वजनिक /खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.

सर्व राजकीय पक्ष, प्रसिद्धी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत  माहिती देण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याhttps://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

 मतदारांची संख्या :-

सन २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक दि.३१ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार महाराष्ट्रातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र. तपशील सन २०१४ सन २०१९
1 पुरुष ४,२७,७०,९९१ ४,५७,०२,५७९
2 महिला ३,८०,२६,९१४ ४,१६,२५,८१९
3 तृतीयपंथी ९१८ २,०८६
  एकूण ८,०७,९८,८२३ ८,७३,३०,४८४

Check Also

शाहु महाराजांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं…

आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *