Breaking News

बीड जिल्हयात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या एस.पी. आणि पी.आय.पाळवदेची जिल्हयाबाहेर बदली करण्याची विरोधी पक्षनेते मुंडे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची तातडीने बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांची आज भेट घेवून केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हेही उपस्थित होते.
बीड लोकसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस प्रशासन निष्क्रियेतेने व सत्ताधार्‍यांच्या मर्जीने काम करीत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या मनात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांसमोरच मारहाण करण्यात आली. यातील आरोपींना तातडीने जामीनही देण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळच्या सभेलाही सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी जागा मिळु दिली नाही. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्लाही करण्यात आला. जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणावर धमक्या देत आहेत. याच पार्श्वभूमीवर सदर तक्रार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या आशीर्वादामुळे व निष्क्रियेतेमुळे या गंभीर घटना घडत असल्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी, जिल्हा अतिसंवेदनशील म्हणुन घोषित करावा, स्थानिक पोलीसांचे सत्ताधार्‍यांशी असलेले लागेबांधे पाहता बाहेरील पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवावी , राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना व कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्याही धनंजय मुंडे यांनी केल्या.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *