Breaking News

नगरविकास मंत्र्यांना म्हणे फाईली वेगळ्या करायला वेळच मिळेना सातारा प्रादेशिक कर्न्झव्हेशनचे धोरण फाईलीवर ८ महिने झाले तरी लाल फितीतच

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील महानगर पालिका आणि जिल्ह्यांच्या अनुषंगाने महत्वाचे खाते असलेल्या नगर विकास विभागाकडे सातत्याने विकासात्मक धोरणाला मंजूरी मिळावी यासाठी अनेक फाईली येत असतात. मात्र या विभागाचे मंत्री असलेले आणि शिवसेनेचे वजनदार म्हणून ओळखले जाणारे मंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच फाईली हातावेगळ्या करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
काही महिन्यापूर्वी सातारा प्रादेशिक कर्न्झव्हेशन आणि समुद्र सपाटीपासून एक हजारहून अधिक उंचीवरील जमिनीसाठी नियमावली तयार करण्यासंदर्भातील एक फाईल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयास अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आली. त्यावर संबधित मंत्र्यांनी सदरची फाईल तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांचे खाजगी सचिव खतगावंकर यांना दिले. मात्र त्यांच्या खाजगी सचिवांनी यासंदर्भातील फाईल सादर करतो असे सांगत त्या विषयीची फाईलच सादर केली नाही. तसेच यासंदर्भात सातत्याने विचारणा केली असता मंत्र्यांना फाईली काढायला वेळ मिळत नसल्याचे उत्तर त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असून एखाद्यावेळी मंत्री फाईली हाता वेगळ्या करण्यासाठी बसले तर फार फार तर चारच फाईली हातावेगळ्या करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्ह्याचे रहिवासी असून या जिल्ह्यांवर त्यांचे प्रेमही आहे. तरीही सातारा प्रादेशिक कर्न्झव्हेशन आणि समुद्र सपाटीपासून एक हजारहून अधिक उंचीवरील जमिनीसाठी नियमावली तयार करण्यासंदर्भातील आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता पूर्ण झालेली असतानाही मंत्र्यांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने सातारकरांमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्याच्या कर्न्झव्हेशन आणि समुद्र सपाटीपासून एक हजारहून अधिक उंचीवरील जमिनीसाठी नियमावली तयार करण्याचा अंतिम मसुदा जवळपास पूर्ण झालेला आहे. त्यासंबधीची प्रक्रिया २०१७ सालापासून सुरु असून २०१८ साली आणि २०१९ साली यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावरील अंतिम काम करून नियमावलीचा आराखडा तयार असून त्यावर मंत्री एकनाथ शिंदे यांची सही झाल्यानंतर तो प्रसिध्द करता येणार आहे. या नियमावलीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील काही रहिवाशांनी त्यांची भेट घेवून ही बाब ही निदर्शनास आणून दिली. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
वास्तविक पाहता राज्यातील शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला किंवा सर्व पक्षियांमधील कोणत्याही आमदार त्यांच्याकडे काम घेवून किंवा अडचण घेवून आल्यास त्यावर तात्काळ मार्ग काढून मदत करण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रसिध्द आहेत. मात्र सातारा जिल्ह्याच्या फाईलीबरोबरच अनेक जिल्ह्यांच्या विकासाच्या फाईली त्यांच्याकडे प्रलंबित असताना त्या हातावेगळ्या का होत नाहीत? असा सवाल अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

Check Also

WhatsApp वर ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत आहे हे नवे फिचर व्हाईस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट मध्ये उपलब्ध

मुंबई: प्रतिनिधी ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे ग्रुप कॉल करणं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *