Breaking News

कामगाराला अपघात घडल्यास ठेकेदारासोबत व्यावसायिकालाही सहआरोपी करणार कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी

राज्यात २७ लाख बांधकाम मजूर व कामगारांसाठी नवीन धोरण आखण्याचे काम सुरु असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यापार्श्वभूमीवर एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी अपघात होवून बांधकाम करणारा कामगारास दुखापत अथवा दुर्दैवी घटना घडल्यास बांधकाम व्यावसायिकालाही ठेकेदारासोबतच सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या बांधकाम मजुरांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पुण्यातील सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे परिसरात मनपा आरोग्य कोठी समोर बांधकाम सुरु असलेल्या ‘सेया’ इमारतीमध्ये दहाव्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरु असताना त्याचा काही भाग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घडली. सर्व मजूर झारखंड येथील रहिवाशी असून कामानिमित्त पुणे येथे राहत होते. बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले सुरक्षेचे उपाय न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा मुद्दा विधान परिषदेत त्यांनी उपस्थित केला.

अशा पद्धतीने होत असलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये अनेकदा स्थानिक व्यावसायिक पोलिसांच्या मदतीने प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. बांधकाम व्यावसायिक व त्यांचे ठेकेदार यांच्यामध्ये कामगार व कामाबाबत होणारा करार सर्वांच्या माहितीकरिता ऑनलाइन उपलब्ध असले पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सरकार कामगारांची नोंद करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवीत आहे. तसेच बांधकाम कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी कंत्राटी पध्दतीने कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात जवळपास ६ लाख कामगारांची नोंद या माध्यमातून झालेली आहे. दुसऱ्यांसाठी घर निर्माण करणाऱ्या या वर्गासाठी घरे, भोजनाकरिता मध्यवर्ती स्वयंपाक गृह असे विविध प्रकारचे लाभ राज्य सरकारकडून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. मार्च २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना विमा संरक्षण देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री निलंगेकर-पाटील यांनी उत्तर देताना दिली.

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *