Breaking News

कृती शिकतेय गरबा

मुंबई: प्रतिनिधी

काही महत्वाकांक्षी कलाकार रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट घ्यायला तयार असतात. कोणी वजन वाढवतं, तर कोणी घटवतं… कोणी आपला लुकच बदलून टाकतं, तर कोणी भूमिकेशी एकरूप होण्यासाठी काहीतरी हटके करतं… नृत्यांमध्ये पारंगत असलेले काही कलाकार एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी विशिष्ट प्रकारची नृत्य शिकण्यासाठीही विशेष मेहनत घेतात. तेलुगू, कन्नड, तमिळ अशा दक्षिणात्य भाषिक चित्रपटांमध्ये यशस्वी अभिनय केल्यानंतर ‘राज : रिबूट’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालेली अभिनेत्री कृती खरबंदाही नेहमीच आपल्या भूमिकांच्या प्रेमात असते. ‘गेस्ट इन लंडन’ आणि ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटांनंतर कृतीचा ‘वीरे दी वेडींग’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याखेरीज कृती ‘यमला पगला दीवाना फिर से’मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी सध्या कृती गरबा शिकत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

‘शादी में जरूर आना’ या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे कृती सध्या खूप आनंदी आहे. यासोबतच ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्सवरही मेहनत घेतेय. यात ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे. ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट देओल बंधूंच्या ‘यमला पगला दीवाना’चा तिसरा भाग आहे. या चित्रपटात कृती एका गुजराती तरुणीच्या भूमिकेत समोर येणार असल्याचं समजतं. यातील एका विशेष गाण्यासाठी कृती गरबा शिकत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ‘यमला पगला दीवाना फिर से’मधील भूमिकेसाठी गरबा शिकण्याची संधी मिळाली असली तरी कृतीला केवळ कामचलाऊ डान्स शिकण्यात रस नाही. तिला या नृत्यात पारंगत व्हायचं आहे. यासाठी ती कसून सराव करतेय. गरब्यातील प्रत्येक हालचाल आपल्याला सहजपणे करता यायला हवी असं तिचं म्हणणं आहे. इयत्ता नववी व दहावीत शिकताना कृतीने नवरात्रीमध्ये गरबा खेळला होता. ‘यमला पगला दीवाना फिर से’मधील गाण्याच्या निमित्ताने बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळत असल्याचंही कृती मानते. हे दांडीया गीत प्रेक्षकांना खूप आवडेल अशी आशाही तिने व्यक्त केली आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *