Breaking News

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकणात १० लाख कुटुंबाची पाहणी कोकण विभागाचे काम अव्वल –मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नवी मुंबई : प्रतिनिधी

कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत.

कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकण विभागातील जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. कोंकण भवन येथे नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंग, कोंकण पोलीस महानिरीक्षक  निकीत कौशिक उपस्थित होते.

राज्यमंत्री अदिती तटकरे  म्हणाल्या की, बरे झालेले रुग्ण आणि त्यांची  माहिती  प्रसार-माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करावी. जनजागृती  प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर द्यावा. सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. ही भावना सर्वत्र असावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी २५ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबात मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.  स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.  यासाठी संपूर्ण राज्यात ५५ हजार २६८ आरोग्यपथके तैनात करण्यात आली असून, काल अखेर ७०.७५ लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.  यात २.८३ कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे.  ३७ हजार ७३३ संशयितांपैकी ४ हजार ५१७ कोविड रुग्ण आढल्याची माहिती देण्यात आली.

कोकण विभागात १ कोटी ९२ लाख ७२ हजार ०६५ लोकसंख्या असून, ४८ लाख ६६ हजार ३७२ कुटुंब संख्या आहे. यासाठी  ७ हजार ४२५ पथकांची आवश्यता आहे.  त्यापैकी ६ हजार ७२१ पथके नेमण्यात आलेली आहेत.  दररोज २ लाख १७ हजार ५९४ कुटुंबांना भेटी दिल्या आहेत. आजअखेर ही संख्या १० लाख ६४ हजार १४३ एवढी होते.  भेटी दरम्यान १ हजार ४०३ तापाचे रुग्ण आढळले तर ३८ हजार ६५८ कोरोना सदृष्य आढळून आले आहेत. कोकण विभागात ६ हजार ७८० ऑक्सिमिटर आवश्यक आहे. त्यापैकी ६ हजार ४२० ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. ६ हजार ६६६ थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे.  त्यापैकी ६ हजार ६०२ थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.

कोकण विभागात या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत फ्लेक्स, बॅनर, वृत्तपत्र प्रसिध्दी आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे. कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजना यामुळे रुग्ण दुप्पटीचा वेग ५५ दिवसांवर आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ मोहिमेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत.  त्यात पालघर जिल्हयात वारली पेंटिंग आणि वारली भाषेमध्ये प्रसिध्दी, सिंधुदूर्गमध्ये दशावताराच्या माध्यमातून प्रसिध्दी, रत्नागिरी जिल्हयात गुडी महोत्सव आणि महापालिकेअंतर्गत ४० जाहिरात फलके, ५ कमाने, १०० बसस्टॉप आणि ७५ बसेसवर प्रसिध्दी करण्यात आली आहे. रायगड जिल्हयात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदा, कल्याण डोंबिवली महापालिकाअंतर्गत ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

बैठकीसाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पालक सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरिक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा कोरोना टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सवाल

जालना: प्रतिनिधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *